दुष्काळात खर्च नको म्हणून लग्न टाकलं लांबणीवर

दुष्काळाच्या दाहकतेमुळे दोन वेळची भाकरी मिळणं मुश्किल झालंय. तिथं लग्न करुन मायबापाला कशाला आणखी कर्जाच्या खाईत लोटायचं असा प्रश्न बीडच्या वारोळा तांडा इथल्या या तरुणीला पडलाय.

Updated: Feb 25, 2016, 07:57 AM IST
दुष्काळात खर्च नको म्हणून लग्न टाकलं लांबणीवर title=

बीड : दुष्काळाच्या दाहकतेमुळे दोन वेळची भाकरी मिळणं मुश्किल झालंय. तिथं लग्न करुन मायबापाला कशाला आणखी कर्जाच्या खाईत लोटायचं असा प्रश्न बीडच्या वारोळा तांडा इथल्या या तरुणीला पडलाय.

लग्नाच्या खर्चाचं गणित जुळत नसल्यानं यंदा लग्नच न करण्याचा निर्णय ज्योतीसारख्या २५ सुशिक्षित मुलींनी  घेतलाय. लग्नासाठी खर्च करायचा कुठून या प्रश्नांनी व्यथित झालेल्या या मुलींनी आईवडिलांच्या डोक्यावरचं ओझं काही काळासाठी तरी बाजूला सारलंय. 

तीन हजार लोकसंख्या असलेल्या वारोळा तांड्यातील निम्म्याहून अधिक घरं अशी कुलुपबंद आहे. काही लोक ऊसतोडणीला गेलीत तर बरेच जण कामाच्या शोधात शहराकडे स्थलांतरित झालीयत.. 

दुष्काळामुळे ऊसतोड कामगारांना सर्वाधिक फटका बसलाय. पाण्याअभावी उसाची लागवड कमी झाली. त्यामुळे अनेक साखर कारखाने सुरूच झालेले नाहीत. थोडे बहुत जे सुरू झालेत ते अवघे दोन-तीन महिने सुरू होते. दरवर्षी निदान सहा महिने तरी काम मिळायचं. पण यंदा केवळ दोन-तीन महिनेच काम मिळाल्यानं ऊसतोड कामगारांनी आपला मोर्चा शहराकडे वळवलाय. 

मराठवाड्यावर गेल्या चार वर्षापासून दुष्काळाचं संकट असताना केवळ मोठमोठ्या घोषणा करण्यापलीकडे सरकार काहीच करताना दिसत नाही. निदान वारोळा तांड्यावरील या उपवर मुलींनी घेतलेल्या निर्णयानंतर तरी झोपलेल्या सरकारचे डोळे उघडतील एवढीच अपेक्षा.