घोटाळ्याचा महामेरू, प्रवर्तक गुरूनानींचे तब्बल १७ फ्लॅट

तळे राखी तो पाणी चाखी... या म्हणीचे आदर्श उदाहरण म्हणजे फाम सोसायटीचे प्रवर्तक मोहन गुरनानी... त्यांनी तब्बल 17 फ्लॅट मिळवून घोटाळेबाजीचा नवा विक्रमच केला असल्याचं पुढं येतंय... गुरनानींच्या या पराक्रमामुळं मूळ लाभार्थ्यांना मात्र घरांपासून वंचित राहावं लागलं, ही वस्तुस्थिती आहे असं ह्या उदाहरणांवरून दिसतं.

Updated: Jul 7, 2014, 08:30 PM IST
घोटाळ्याचा महामेरू, प्रवर्तक गुरूनानींचे तब्बल १७ फ्लॅट title=

नवी मुंबई : तळे राखी तो पाणी चाखी... या म्हणीचे आदर्श उदाहरण म्हणजे फाम सोसायटीचे प्रवर्तक मोहन गुरनानी... त्यांनी तब्बल 17 फ्लॅट मिळवून घोटाळेबाजीचा नवा विक्रमच केला असल्याचं पुढं येतंय... गुरनानींच्या या पराक्रमामुळं मूळ लाभार्थ्यांना मात्र घरांपासून वंचित राहावं लागलं, ही वस्तुस्थिती आहे असं ह्या उदाहरणांवरून दिसतं.

 
आदिराज कोठाडिया यांच्या वडिलांना मरणापूर्वी फाम सोसायटीतील स्वत:च्या फ्लॅटमध्ये राहण्याची शेवटची इच्छा होती. त्यांची ही इच्छा अपूर्णच राहिली. कोठाडिया यांनी स्वत:च्या मालकीचा फ्लॅट मिळणार म्हणून 2007 सालापर्यंत 8 लाख 37 हजार रुपये भरले. परंतु त्यांचा हक्काचा फ्लॅट कधीच दुस-यांच्या घशात घालण्यात आलेला आहे. 
 
जगदीश रावळ यांचीही तीच कथा आणि तीच व्यथा. मिरचीची दलाली करणा-या रावळ कुटुंबीयांनी फाम सोसायटीत फ्लॅट मिळणार म्हणून सेंट्रल बँकेचे कर्ज काढून 8 लाख रुपये भरले. बँकेचे कर्जाचे हफ्ते भरणंही सुरु आहे. परंतु त्यांचा हक्काचा फ्लॅट दुस-यांना देण्यात आल्यानं सध्या ते नवी मुंबईतच भाड्याच्या घरात राहत आहेत.
 
वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेले हे शरद दवे असू देत किंवा ऐकू न येणारे हे अशोक लोढिया.. फ्लॅटचे पैसे भरले परंतु घर काही मिळाले नाही.
 
नियमानुसार सर्व कागदपत्रांची पूर्तता केली, पैसेही भरले. मात्र या सामान्य लोकांना फ्लॅट नाकारण्यात आले. एकही फ्लॅट सामान्यांच्या पदरात पडलेला नसताना मोहन गुरनानी आणि त्यांच्या सहका-यांनी किती फ्लॅट मिळवलेत. त्यावर नजर टाकल्यास या कथित घोटाळ्याचं गांभीर्य समजून येतं. फाम सोसायटीचे संस्थापक असलेल्या मोहन गुरनानी आणि त्यांच्या कुटुंबियांनी या सोसायटीत तब्बल सतरा फ्लॅट मिळवलेत.
 
स्वतः मोहन गुरनानी यांचे तीन फ्लॅट... त्यांच्या पत्नी राजू गुरनानी यांचे तीन फ्लॅट... मुलगी प्रिया गुरनानीचे तीन फ्लॅट, प्रिती गुरनानीचे दोन फ्लॅट, दीपा गुरनानीचा एक फ्लॅट... मोहन गुरनानींचे पुतणे आणि त्यांच्या पत्नींच्या नावेही फ्लॅटवाटप करण्यात आलं.
 
कुटुंबियांच्या नावे फ्लॅट घेतल्याचे मोहन गुरनानी यांनी मान्य केलं असलं तरी सध्या केवळ दोनच फ्लॅट ताब्यात असल्याचं त्यांनी सांगितलंय. तसंच फाम प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी पैसे कमी पडत होते, म्हणून त्यावेळी आमच्या कुटुंबियांतील लोकांनी पैसे भरून हे फ्लॅट घेतल्याचा खुलासा त्यांनी केलाय. तर पुतणे एपीएमसीमध्ये व्यवसाय करत असल्यानं ते फ्लॅट घेण्यासाठी पात्र ठरत असल्याचं गुरनानींचं म्हणणं आहे.
 
सोसायटीचा सेक्रेटरी असलेला दशरथ उपाध्याय यानंही चांगलाच हात धुवून घेतला आहे. त्यानंही तीन फ्लॅट आणि एक दुकानगाळा बळकावल्याचा आरोप होतोय.
 
दशरथ उपाध्याय पूर्वी ज्यांच्याकडे कामाला होते, त्या गिरीश पटेल यांनीही तब्बल सहा फ्लॅट, मोहन गुरनानींच्या बांधकाम क्षेत्रातील पार्टनर असलेल्या दिलीप वोरांच्या कुटुंबियांना तब्बल 7-8 फ्लॅट आणि 9 दुकानगाळे, सोसायटी बांधकामाचे कंत्राट घेणा-या चंद्रकांत पटेलांना तीन तर जमनादास ठक्कर यांना चार फ्लॅट आणि दोन दुकानगाळे, गुरनानींचे सहकारी उमरावचंद जैन यांनाही पाच फ्लॅट आणि एक दुकानगाळा देण्यात आल्याचा आरोप होतोय.
 
एका व्यक्तीला किंवा एका कुटुंबाला किती फ्लॅट द्यावेत. यावर कुठलीही मर्यादा न ठेवता फ्लॅटचे वाटप करण्यात आलंय. दीड हजार फ्लॅटच्या या सोसायटीत सुमारे 80 कुटुंबियांना दोन आणि दोनहून अधिक फ्लॅट देण्यात आलेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.