कांद्याला चक्क 5 पैसे दर, शेतकरी हवालदील

निफाड तालुक्यातल्या करंजगावच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला पाच पैसे किलोचा दर मिळाला. 

Updated: Aug 23, 2016, 07:01 PM IST
कांद्याला चक्क 5 पैसे दर, शेतकरी हवालदील title=

नाशिक : कांदा कधी ग्राहकांना रडवतो तर कधी शेतकऱ्यांना. सध्या कांदा शेतकऱ्यांच्या जीवावरच उठला आहे. निफाड तालुक्यातल्या करंजगावच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला पाच पैसे किलोचा दर मिळाला. 

मातीमोल भावाने देण्यापेक्षा घरी नेला

सरकारने पाच पैशाचं नाणे बंद करून मोठा काळ उलटला. मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या नशिबातून पाच पैसा कायम असल्याचे हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मिलिंद दराडे असे या दुर्दैवी शेतकऱ्याचं नाव आहे. दराडे यांनी आपला कांदा मातीमोल भावाने विकण्यापेक्षा घरी परत नेणे पसंत केले. तब्बल पाचशे क्लिंटल कांदा असल्यामुळे त्यांनी चांगल्या दराची प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला.

सडलेला कांदा शेतात फेकला

मात्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी नियमन मुक्तीचा निर्णय घेतला खरा. मात्र या निर्णयाला व्यापाऱ्यांनी विरोध करत बाजार समित्या बंद ठेवल्या. यामुळं मात्र दराडेंचा उत्पादन खर्च तर सोडाच पण वाहतूक खर्चही निघाला नाही. उलट दराडे यांच्यावर कांदा अनेक दिवस शेतातच पडू देण्याची वेळ आली. अखेर हा सर्व कांदा सडला. निराश झालेल्या दराडेंनी अखेर आपला कांदा स्वत:च्याच शेतात फेकून दिला.