इतिहास घडवणाऱ्या हसिना फारस यांचा जिद्दी लढा

कोल्हापूरात इतिहास घडला... शहराच्या महापौरपदी पहिली मुस्लिम महिला विराजमान झाली. ६१ वर्षीय हसिना फारस. पण त्यांच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. कुटुंबानं साथ दिली त्यामुळे त्या हा लढा जिंकल्या. धार्मिक नेत्यांचे फतवे, धमक्या या साऱ्या गोष्टी पार करत त्या या पदावर विराजमान झाल्यात.

Updated: Dec 20, 2016, 07:14 PM IST
इतिहास घडवणाऱ्या हसिना फारस यांचा जिद्दी लढा title=

प्रताप नाईक, कोल्हापूर : कोल्हापूरात इतिहास घडला... शहराच्या महापौरपदी पहिली मुस्लिम महिला विराजमान झाली. ६१ वर्षीय हसिना फारस. पण त्यांच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. कुटुंबानं साथ दिली त्यामुळे त्या हा लढा जिंकल्या. धार्मिक नेत्यांचे फतवे, धमक्या या साऱ्या गोष्टी पार करत त्या या पदावर विराजमान झाल्यात.

६१ वर्षीय हसिना फारस गेल्या वर्षी कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या. पण, ही निवडणूक त्यांच्यासाठी सोपी नव्हती. राजकीय विरोधकच नाही तर कट्टरपंथियांच्याही मोठ्या विरोधाचा सामना त्यांना करावा लागला. हसिना यांच्या विरोधात फतवा काढण्यात आला, त्यांच्या निवडणूक लढवण्यालाही इस्लामविरोधी म्हटलं गेलं... पण हसिना इराद्याच्या पक्क्या होत्या. राष्ट्रवादीकडून त्यांनी निवडणूक लढवली आणि जिंकल्याही... इतकचं नाही तर आता वर्षभरानंतर त्या पहिल्या मुस्लिम महिला महापौरही झाल्या.

हसिना यांच्यासह २८ मुस्लिम महिलांनी गेल्या वर्षी कोल्हापूर महापालिकेची निवडणूक लढवली. त्यावेळी काही मौलवींनी या मुस्लिम महिला उमेदवारांविरोधात फतवा काढला होता. या महिलांना धमक्याही दिल्या. पण त्या धैर्यानं लढल्या. हसिना यांच्यासह चारजणी निवडूनही आल्या.

ज्यावेळी धार्मिक नेत्यांकडून आपल्याला फतवे दिले जात होते त्यावेळी आपल्यामागे आपलं कुटुंब खंबीरपणे उभं होतं, हे सांगायला हसिना विसरल्या नाहीत... आता त्यांच्या हातून मुस्लिम महिलांच्या जगण्याचा दर्जा सुधारण्यासाठी पावलं उचलली जातील, अशी अपेक्षा करुया.