उदय साळुंखेंचे संस्थांचे 'इमले'... 'शिप्र' मात्र होरपळले!

शिक्षण प्रसारक मंडळीच्या वेलिंगकर इन्सिट्यूटचे संचालक डॉ. उदय साळुंखे यांनी अल्पावधीत जी प्रगती साधली, त्याबद्दल आयकर खात्यानंही आश्चर्य व्यक्त केलंय. 'झी मीडिया'नं त्याबाबतचं वृत्त याआधीही दाखवलं होतं. आता कुटुंबीयांनाच संचालक मंडळावर घेऊन साळुंखेंनी प्रगती फास्ट कशी केली, याची नवी माहिती उपलब्ध झालीय.

Updated: Jul 10, 2015, 10:52 AM IST
उदय साळुंखेंचे संस्थांचे 'इमले'... 'शिप्र' मात्र होरपळले! title=

पुणे : शिक्षण प्रसारक मंडळीच्या वेलिंगकर इन्सिट्यूटचे संचालक डॉ. उदय साळुंखे यांनी अल्पावधीत जी प्रगती साधली, त्याबद्दल आयकर खात्यानंही आश्चर्य व्यक्त केलंय. 'झी मीडिया'नं त्याबाबतचं वृत्त याआधीही दाखवलं होतं. आता कुटुंबीयांनाच संचालक मंडळावर घेऊन साळुंखेंनी प्रगती फास्ट कशी केली, याची नवी माहिती उपलब्ध झालीय.

मावळ तालुक्यातल्या कार्ला गावात १० एकर १२ गुंठे जमिनीवर उभी असलेली ही इमारत... या जागेत आता 'इन्स्टिट्यूट ऑफ फ्युचर एज्युकेशन आंत्रप्रिनरशीप अॅन्ड लीडरशीप' म्हणजे 'आयफील' ही अद्ययावत संस्था उभी आहे. वेलिंगकर इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा डॉ. उदय साळुंखे आणि त्यांच्या कुटुंबियांनी ती सुरू केलीय.

'झी मीडिया'कडे उपलब्ध माहितीनुसार, डॉ. साळुंखे यांनी २६ ऑक्टोबर २००४ रोजी हा भूखंड विकत घेतला तो १३ लाख ९० हजार रूपयांना... या व्यवहारात खरेदीदार म्हणून अनुज दुर्गाप्रसाद पांडे आणि कोकिला मनहर ब्रह्मभट्ट यांचीही नावे आहेत. ही मिळकत नंतर ग्लोबल एज्युकेशन ट्रस्टला १३ मार्च २००९ रोजी विकण्यात आली. 

विशेष म्हणजे, या ट्रस्टमध्ये स्वाती उदय साळुंखे, बाळकृष्ण नामदेव साळुंखे, भीमराव अर्जुनराव सुर्वे आणि सुचित्रा भीमराव सुर्वे हे संचालक होते. हे सगळे उदय साळुंखेंचे कुटुंबीयच आहेत. २००४ रोजी १३ लाख ९० हजार रूपयांना घेतलेला भूखंड २००९ मध्ये १ कोटी ६० लाख ४९ हजार रूपयांना विकण्यात आला.

उदय साळुंखे यांनीच या जमिनीवर बांधकाम करण्यासाठी बिगर शेती परवाना मिळवला. त्यानंतर 'शिष्य उन्नती कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड' या साळुंखे परिवाराशी संबंधित संचालक मंडळाच्या कंपनीनंच २००८ मध्ये नगररचना कार्यालयाकडून बांधकामाची अंतिम मंजुरी मिळवली. या जागेवरच सध्याची इमारत उभी आहे.

एकीकडे साळुंखे कुटुंबीय प्रगती साधत असतानाच, शि. प्र. मंडळीची आर्थिक स्थिती मात्र खालावत चालली होती. साळुंखे कुटुंबिय असे संस्थांचे इमले उभे करत असतानाच, शि. प्र. मंडळी आपले विस्ताराचे कार्यक्रम राबवू शकले नाही, असं जयवंत किराड, सतीश पवार या  नियामक मंडळाच्या सदस्यांचं म्हणणं आहे.

विशेष म्हणजे, संस्थेच्या कागदपत्रांमध्ये प्रमोद मुळीक, डॉ. पी. एस. राव आणि दीपा दीक्षित यांची नावं विश्वस्त आणि व्यवस्थापकांच्या यादीत आहेत. हे सर्वजण शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेचे पूर्णवेळ कर्मचारी आहेत. साळुंखे कुटुंबियांनी सुरू केलेल्या १५५ कंपन्यांपैकी निम्म्या कंपन्यांचे पत्ते गोरेगाव, तर उर्वरित कंपन्यांचे पत्ते चेंबूरमधले आहेत. एकाच पत्त्यावरून अनेक कंपन्या कामकाज करत असल्याचं कागदपत्रांवरून समोर आलंय.

महत्त्वाची बाब म्हणजे, या सर्व कंपन्या ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत, ते उदय साळुंखे वेलिंगकर इन्स्टिट्यूटचे फक्त संचालक आहेत. त्यामुळं त्यांनी एवढी प्रगती कशी साधली? हे कोडे आणखीच वाढलंय. याबाबत साळुंखे आणि शिप्र मंडळींशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न करूनही त्यांनी 'झी मीडिया'ला प्रतिसाद दिलेला नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.