कोकण रेल्वेला २५ वर्षे, कोकणवासियांच्या समस्या कायम

कोकण रेल्वेच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झालीत. मात्र कोकणवासियांच्या समस्या जैसे थे आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे कोकण सुपूत्र असल्याने कोकणवासियांना न्याय मिळणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

Updated: Oct 15, 2015, 10:01 AM IST
कोकण रेल्वेला २५ वर्षे, कोकणवासियांच्या समस्या कायम title=

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झालीत. मात्र कोकणवासियांच्या समस्या जैसे थे आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे कोकण सुपूत्र असल्याने कोकणवासियांना न्याय मिळणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

आजूबाजूचा हिरवा निसर्ग. डोंगररांगा, बोगदे, दरी, नद्या आणि खाड्या यांतून वाट काढत धावणारी कोकण रेल्वे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट नमुना म्हणजेच कोकण रेल्वे. १५ ऑक्टोबर १९९० हा दिवस कोकणवासियांसाठी स्वप्नपूर्तीचा ठरला. कारण याच दिवशी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना झाली. रोहा ते मडगाव या ७४१ किमी लांबीच्या रेल्वे मार्गामुळं कोकणात रेल्वे धावण्याचं स्वप्न पूर्ण झालं.

१९ ऑक्टोबर १९९० मध्ये मडगाव, रत्नागिरी आणि रोह्यात कोकण रेल्वेच्या कामांना सुरुवात झाली. कोकण रेल्वेमार्गावरील पहिली रेल्वे २० मार्च १९९३ रोजी मंगळूर ते उडुपी दरम्यान धावली. रोहा-वीर-खेड-सावंतवाडी या मार्गाचे काम डिसेंबर १९९६ मध्ये पूर्ण झाले. उत्तर गोव्यामधील पेडणे येथील एका बोगद्याचे काम पूर्ण होण्यास एकूण ६ वर्षांचा कालावधी लागला. अखेर २६ जानेवारी १९९८ रोजी कोकण रेल्वेचे उद्घाटन झालं. 

कोकण रेल्वेतून पहिला प्रवास करण्याचा मान मिळाला तो रत्नागिरीतल्या बोडस पितापुत्रांना. आजही पहिल्या प्रवासाच्या आठवणी त्यांनी जपून ठेवल्यात. कोकण रेल्वेला २५ वर्ष होत असली तरी दुपदरीकरणाचं घोंगडं भिजत पडलंय. इतर मागण्यांबाबतही कोकण रेल्वेचं धोरण उदासीनच असल्याचा आरोप होतोय.

रत्नागिरीतून आणखी एक गाडी सोडण्याची मागणी आहे. त्याचवेळी चिपळूणहून एक गाडी सोडण्यात यावी, अशीही मागणी आहे. मात्र, त्याकडे प्रायोगित तत्व म्हणून पाहिले जाते. कायमस्वरून गाडी सुरु करण्यात येत नाही. तसेच डबल डेकरचेही स्वप्नच दाखविण्यात आले. ही गाडी काही दिवस धावली. मात्र, उत्तर भारतीय अधिकाऱ्यांच्या हेकेखोर वृत्तीमुळे यार्डातच सडत आहे. याकडे 'प्रभू' लक्ष देतील का? कोकण रेल्वेचे मुख्यालय मडगावला नेण्यात येत आहे. हे मुख्यालय रत्नागिरीत असावे, अशी कित्येक वर्षांची मागणी आ  आता रेल्वेमंत्रीपदी कोकणचे सुपुत्र सुरेश प्रभू विराजमान आहेत. २५ वर्षपूर्ती निमित्ताने प्रभू कोकण रेल्वेला पावणार का आणि कोकण रेल्वेला अच्छे दिन येणार का हे प्रश्न मात्र अनुत्तरितच आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.