कोकण रेल्वेच्या १७ स्थानकांवर सीसीटीव्ही वॉच

मध्य आणि पश्चिम रेल्वेपाठोपाठ आता कोकण रेल्वे मार्गावरील १७ स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यात रत्नागिरी क्षेत्रातील नऊ आणि कारवार क्षेत्रातील आठ स्थानकांचा समावेश आहे.

Updated: Sep 7, 2016, 09:55 AM IST
कोकण रेल्वेच्या १७ स्थानकांवर सीसीटीव्ही वॉच title=
संग्रहित छाया

मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेपाठोपाठ आता कोकण रेल्वे मार्गावरील १७ स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यात रत्नागिरी क्षेत्रातील नऊ आणि कारवार क्षेत्रातील आठ स्थानकांचा समावेश आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय कोकण रेल्वे महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार १७ स्थानकांवर प्रत्येकी १५ ते १६ कॅमेरे लागणार असून त्याद्वारे प्रवासी सुरक्षा, स्थानक स्वच्छता आदी गोष्टींवर लक्ष ठेवण्यात येईल. त्यासाठी मडगाव येथे या सर्व स्थानकांवरील सीसीटीव्हीसाठी नियंत्रण कक्ष उभारला जाणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वेने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.

कोकण रेल्वेवर गणेशोत्सव, उन्हाळी सु्टी, शिमगा, ख्रिसमस, नवीन वर्ष  यावेळी प्रचंड गर्दी असते. त्या वेळी इतर काळातही प्रवाशांचे सामान, रेल्वे मालमत्ता आणि प्रवासी आदींच्या सुरक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी कोकण रेल्वेच्या महत्त्वाच्या स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव होता. त्या प्रस्तावानुसार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय कोकण रेल्वे महामंडळाने घेतला आहे. 

या कॅमेऱ्यांमध्ये ३० दिवसांचे चित्रीकरण उपलब्ध असेल. त्याचप्रमाणे स्थानक लॉबी, प्लॅटफॉर्म, आरक्षण खिडक्या, स्थानकाचे प्रवेशद्वार आदी ठिकाणी हे कॅमेरे असतील.  

या ठिकाणी असणार वॉच

रत्नागिरी विभागातील - खेड, चिपळूण, रत्नागिरी,
सिंधुदुर्ग विभागातील - कणकवली, कुडाळ, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी
रायगडमधील - कोलाड, माणगाव 
गोवा - कारवार विभागातील – पेरनेम, करमाळी, कानकोना, कारवार, गोकर्ण, भटकळ, उडुपी आणि सुरथकळ.