व्यंगचित्रांच्या बादशहाची एक्झिट: संपूर्ण कारकीर्द

विख्यात व्यंगचित्रकार आणि लेखक आर. के. लक्ष्मण  यांच्या मृत्यूनं व्यंगचित्रकलेतला 'अनकॉमन मॅन' हरपला आहे. लक्ष्मण यांच्या कॉमन मॅननं सहा दशकांपेत्रा जास्त काळ हसता हसता आपल्याला अंतर्मुख केलं. 

Updated: Jan 26, 2015, 10:28 PM IST
व्यंगचित्रांच्या बादशहाची एक्झिट: संपूर्ण कारकीर्द title=

पुणे: विख्यात व्यंगचित्रकार आणि लेखक आर. के. लक्ष्मण  यांच्या मृत्यूनं व्यंगचित्रकलेतला 'अनकॉमन मॅन' हरपला आहे. लक्ष्मण यांच्या कॉमन मॅननं सहा दशकांपेत्रा जास्त काळ हसता हसता आपल्याला अंतर्मुख केलं. 

रसिपुरम कृष्णास्वामी लक्ष्मण.. कोटयवधी चाहत्यांसाठी फक्त आर. के लक्ष्मण...
गेली सहा दशकं लक्ष्मण यांची व्यंगचित्र आणि त्यांनी रेखाटलेला कॉमन मॅन आपल्या जीवनाचा भागच बनून गेला होता.

लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांमध्ये काय नव्हतं? खुसखुशित विनोद, विडंबन, विरोधाभास, हसता हसता रडवणारं अस्सल विदुषकी भाष्य, चेहऱ्यावर स्मितरेषा उमटवतं विचार करायला लावणारं जीवन तत्वज्ञान... लक्ष्मण यांच्या रेषांमधून जणू सर्वसामान्य माणसाचा आवाजचं व्यक्त होत असे...

आर. के. लक्ष्मण यांचा कॉमन मॅन कायम आश्वर्यचकित झालेला बावचळलेला दिसे. कारण भारतात आणि जगात जे काही सुरु आहे ते पाहून सर्वसामान्य माणूसही असाच बावचळून जातो.

भारतीय माणसाचं आयुष्यचं जणू लक्ष्मण यांच्या रेषांशी जो़डल्या गेलं होतं. भारताच्या स्वातंत्र्यांनंतर पुढची काही सहा दशकं अशी एकही महत्वाची घटना नव्हती की ज्यावर लक्ष्मण यांनी आपल्या खास शैलीत व्यगंचित्रांव्दारे भाष्य केलं नाही.

बारिससारिक तपशिल टिपणारी सुक्ष्म निरिक्षणशक्ती, नेमका विराधाभास हेरत त्यावर उपरोधिक तिरकस शैलीत अचूक भाष्य करणं आणि हसवता हसवता चिमटे काढत, टपली मारत सर्वसामान्य माणसाच्या भावना व्यक्त करणं म्हणजे लक्ष्मण यांची व्यंगचित्रकला होती.

लक्ष्मण यांचा जन्म म्हैसूरचा... २३ ऑक्टोबर १९२४ हा लक्ष्मण यांचा जन्मदिवस. लक्ष्मण यांना लहानपणापासूनच रेखाटणांची आवड. वडिल मुख्याध्यापक. मोठा भाऊ आर. के नारायण विख्यात लेखक. त्यात घरी व्यंगचित्रांसाठी प्रसिद्ध अससेली 'पंच'सारखी नियतकालिके येत.. या सगळ्यामुळं लक्ष्मण यांची रेखाटनांची आवड जोपासली गेली. 

आपले बंधु आर. के. नारायण यांचा पुस्तकांची रेखाटनंही लक्ष्मण यांनी केली.  पुढं पदवीनंतर लक्ष्मण व्यंगचित्रकाराची नोकरी मिळवण्यासाठी दिल्लीला गेले पण अनेक ठिकाणी नकारघंटा ऐकावी लागली. शेवटी मुंबईतल्या फ्री प्रेस जर्नलमध्ये लक्ष्मण यांच्या कारकिर्दीनं आकार घेतला. इथं त्यांचे सहकाही होते बाळासाहेब ठाकरे. लक्ष्मण आणि बाळासाहेब ठाकरेचा ऋणानुबंध पुढे आय़ुष्यभर टिकला. शिवसेनेच्या स्थापनेनंतर बाळासाहेबांवर लक्ष्मण यांनी व्यंगचित्रांमधून फटकारेही ओढले. पण दोघांची मैत्री कायम राहिली. 

'फ्री प्रेस जर्नल' नंतर लक्ष्मण खऱ्या अर्थानं स्थिरावले ते टाईम्स ऑफ इंडियात... लक्ष्मण यांची व्यंगचित्रं टाईम्सची खास ओळख बनली ते अखेरपर्यंत. 'यू सेट ईट' ही त्यांची व्यंगचित्रमालिका तुफान गाजली. भारतातील राजकारणी असो की उद्योजक. सत्ताधारी असो की विरोधक.. खेळाडू असो की धर्मगुरु... घटना देशातली असो की परदेशातली. लक्ष्मण यांचा कुंचला त्यातली विसंगती अचूक टिपत असे.. मग साकारे खास लक्ष्मण शैलीतलं व्यंगचित्रं.

जवाहरलाल नेहरु, महात्मा गाधींपासून, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे ते सोनिया गांधींपर्यंत सगळा राजकीय प्रवास लक्ष्मण यांनी रेखाटला.

समोर कोरा कॅनव्हास घेऊन विचारमग्न अवस्थेत बसलेले लक्ष्मण टाईम्सच्या कार्यालयात दुपारी दिसत.. संध्याकाळी कार्यालय सोडण्यापुर्वी त्यांनी साकारलेलं असे खास लक्ष्मण शैलीतलं व्यंगचित्र...

याच  खास लक्ष्मण शैलीमुळं त्यांचा कॉमन मॅन जणू घरातलाच सदस्य बनला.. मोठमोठया नेत्यांप्रमाणे पुतळे उभे राहण्याचं भाग्यही या कॉमन मॅनच्या वाटयाला आलं. 

लक्ष्मण हे फक्त व्यंगचित्रकारचं नव्हते तर आपल्या भवतालाचं निरक्षण करणारे एक संवेदनशिल कलावंतही होते.. मुंबईत आयुष्याचा मोठा काळ गेलेल्या लक्ष्मण यांनी इथल्या कावळ्यांनीही भुरळ पाडली होती.. मुंबईचे कावळे ही त्यांची मालिका खूप गाजली..

कुंचल्याप्रमाणेच लक्ष्मण यांची लेखणीही जोमदार होती.  'द टनेल ऑफ टाईम' आणि 'Through a Coloured Glass' या आत्मचरित्रांतून लक्ष्मण यांनी आपला जीवनप्रवास रेखाटला. त्यांनी कथांबरोबरच 'द होटल रिव्हिएरा', 'द मेसेंजर' या सारख्या कांदब-या आणि 'The Distorted Mirror' सारखी प्रवासवर्णन पर पुस्तकंही लिहिली.

लक्ष्मण गेली काही वर्ष आजारीच होते. २००३ मध्ये त्यांना पक्षाघाताचा झटका आला आणि त्यांच्या हालचाली मंदावल्या. शेवटची काही वर्ष त्यांनी आपली पत्नी कमलासह पुण्यात काढली. आजारपणातही बेडवरुनही त्यांनी काही वर्ष अनेक व्यंगचित्रं काढली..पुढे तीही थांबली... आता तर व्यंगचित्रांच्या या बादशहानं एक्झिटचं घेतलीय. आता मागे उरलाय तो लक्ष्मण यांचा अजरामर कॉमन मॅन....

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.