मोदी सरकारचं महाराष्ट्राला 'रिटर्न गिफ्ट'... पुण्याला लॉटरी!

महाराष्ट्रात मोदी सरकारला मिळालेल्या या यशाला ध्यानात ठेऊन अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काही महत्त्वाच्या तरतूदी करत सरकारनं राज्याला एक प्रकारे 'रिटर्न गिफ्ट'च दिलंय.

Updated: Jul 10, 2014, 02:28 PM IST
मोदी सरकारचं महाराष्ट्राला 'रिटर्न गिफ्ट'... पुण्याला लॉटरी! title=

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2014 मध्ये भाजपाला महाराष्ट्रात उल्लेखनीय असं यश मिळालं... महाराष्ट्रात मोदी सरकारला मिळालेल्या या यशाला ध्यानात ठेऊन अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काही महत्त्वाच्या तरतूदी करत सरकारनं राज्याला एक प्रकारे 'रिटर्न गिफ्ट'च दिलंय.

विदर्भामध्ये, ‘असोसिएशन ऑफ इंडियन मॅनेजमेंट स्कूल’ अर्थात एम्सची स्थापना करण्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आलीय.

त्याचप्रमाणे, महाराष्ट्रात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अर्थात आयआयएम स्थापण्याचीही घोषणा करण्यात आलीय.

20 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांत मेट्रो सुरू करण्याचा प्रस्तावही अर्थमंत्र्यांनी आज संसदेत मांडलाय.    

पुण्याचे 'अच्छे दिन...' 
मुंबईनंतर पुण्याचे 'अच्छे दिन' येणार असं म्हणायला आता हरकत नाही... कारण, अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडोरचे मुख्यालय पुण्यात सुरू करण्याचा प्रस्ताव मांडलाय... यासाठी तब्बल 100 कोटींची तरतूदही करण्यात आलीय. शिवाय पुण्यातच बायोटेक्नॉलॉजी क्लस्टरचाही प्रस्ताव जेटलींनी आज संसदेत मांडलाय.  

त्याचप्रमाणे, पुण्यातील 'फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया'ला (म्हणजेच FTIIला) राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचा दर्जा देणार असल्याचंही अर्थमंत्र्यांनी संसदेत म्हटलंय. 

शेतकऱ्यांसाठी नवीन टीव्ही चॅनल
देशात, शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी नवं 'किसान टीव्ही चॅनेल' सुरू कणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी म्हटलंय. या टीव्ही चॅनलसाठी 100 कोटी रुपयांच्या निधीची तरतूदही करण्यात आलीय.   

देशातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शेतकर्ज योजना सुलभ करणार, शेती कर्जासाठी 8 लाख कोटींची तरतूद, पाच लाख भूमिहिन शेतकऱ्यांना मदत, ग्रामज्योती योजनेसाठी 500 कोटी, मातीपरिक्षण प्रयोगशाळांसाठी 56 कोटी, पंतप्रधान सिंचन योजनेसाठी एक हजार कोटी अशा अनेक घोषणा यावेळी करण्यात आल्यात. तसंच किसान विकास पत्र पुन्हा सुरु करणार असल्याची घोषणा जेटलींनी केलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.