राष्ट्रवादी काँग्रेसचं नक्की चाललंय काय?

राज्यात गेल्या दोन दिवसांत विविध घटनांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत अनेक जण अडकल्याचं चित्र उभं राहिलंय. सोलापूरात राष्ट्रवादीचे मंत्री लक्ष्मणराव ढोबळे हे पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करत असल्याचं उघड झालंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 6, 2012, 04:17 PM IST

www.24taas.com, मुंबई
राज्यात गेल्या दोन दिवसांत विविध घटनांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत अनेक जण अडकल्याचं चित्र उभं राहिलंय. सोलापूरात राष्ट्रवादीचे मंत्री लक्ष्मणराव ढोबळे हे पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करत असल्याचं उघड झालंय. महापालिका निवडणुकीत बुथ ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात अटक झालेल्या विराज पाटील या कार्यकर्त्याला नियमबाह्य सोडून देण्यासाठी त्यांनी पोलिसांवर दबाव आणला होता.
एकीकडे पाणीपुरवठा मंत्र्यांचा हा प्रताप उजेडात येत असतानाच काल सकाळी ठाण्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कळव्यातल्या झोपड्या हटवू नयेत, यासाठी रेलरोको आंदोलन छेडलं. या प्रकरणाशी कोणताही संबंध नसलेल्या लाखो लोकल रेल्वे प्रवाशांना त्यांनी वेठीला धरलं. ऐन गर्दीच्या वेळी तब्बल 100 लोकल्स रद्द कराव्या लागल्या. एकीकडे प्रवासी त्रस्त असताना झोपडीवासियांसाठी नियोजित असलेलं सर्वपक्षीय आंदोलन आव्हाडांनी हायजॅक केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केलाय.
नागपूरात काल घडलेली घटना पुन्हा पोलिसांवर होणा-या कुरघोडीचीच आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चक्क एका पोलिसाचं अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. ड्युटीवर असलेल्या पोलिस शिपायाचं अपहरण केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहर अध्यक्ष विशाल लारोकर आणि सचिव उज्ज्वल खिमची यांना अटक करण्यात आली. पुन्हा कालच्याच चौथ्या घटनेत बदलापूरच्या राष्ट्रवादीच्या गटनेत्यानं एका पालिका अभियंत्याला कार्यालयात घुसून मारहाण केल्याची घटना घडलीय. याबाबत अभियंता किरण गवळे यांनी नगरसेवक राजेंद्र चव्हाण यांच्याविरोधात तक्रार दाखल केलीय. एकाच पक्षाच्या अनेक नेत्यांचा अशा घटनांमध्ये समावेश उघड झालाय.
एकीकडे गृहमंत्री पोलिसांचं मनोधैर्य वाढवण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावा करत असताना त्यांच्याच पक्षाचे मंत्री आणि कार्यकर्ते पोलिसांना त्रास देत असल्याचं चित्र आहे. कुठे आंदोलनाच्या नावाखाली एक आमदार लाखो प्रवाशांना वेठीस धरतो. तर कुठे नगरसेवकरच पालिका अभियंत्याला कार्यालयात घुसून मारतो. कार्यकर्त्यांच्या या कृत्यांकडे पक्ष नेतृत्वाचं खरोखर दुर्लक्ष होतंय की याकडे काणाडोळा केला जातोय, अशी शंका आता सर्वसामान्यांमधून व्यक्त होतेय.