थोड्याच वेळात स्पष्ट होणार नगरपालिकांचा निकाल

दुसऱ्या टप्प्यातील नगरपालिका निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार आहे. यात पुण्यातील 10 आणि लातूरमधील 4 नगरपालिकांचा समावेश आहे. बुधवारी या नगरपालिकांचं मतदान पार पडलं.

Updated: Dec 15, 2016, 08:03 AM IST
थोड्याच वेळात स्पष्ट होणार नगरपालिकांचा निकाल  title=

मुंबई : दुसऱ्या टप्प्यातील नगरपालिका निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार आहे. यात पुण्यातील 10 आणि लातूरमधील 4 नगरपालिकांचा समावेश आहे. बुधवारी या नगरपालिकांचं मतदान पार पडलं.

दोन्ही जिल्ह्यात मिळून सरासरी 72 टक्के मतदानाची नोंद झाली. पुणे आणि लातूरमधील एकूण 14 नगरपालिकांसाठी 1 हजार 426 उमेदवारांचं भवितव्य मतदार यंत्रात बंद झालंय.

सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे. पहिल्या तासाभरातच निकालाचं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. बारामती, इंदापूर, जेजुरी, सासवड, निलंगा आणि अहमदपूर इथल्या निकालांकडे विशेष लक्ष असणार आहे.

भाजपची फिल्डिंग

पहिल्या टप्प्याच्या निकालांमध्ये नगराध्यक्षपदांच्या शर्यतीत भाजपनं बाजी मारली होती. तर शिवसेना दुसऱ्या काँग्रेस तिसऱ्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस चौथ्या स्थानावर फेकली गेली होती. काल झालेल्या मतदानाआधी पुणे जिल्ह्यातल्या नगर परिषदांवर राष्ट्रवादीचं वर्चस्व होतं. हे वर्चस्व मोडून काढण्यासाठी भाजपनं जोरदार फिल्डिंग लावली होती.

बापटांची प्रतिष्ठा पणाला

हिवाळी अधिवेशनापुरता संसदीय कार्य मंत्रीपदाचा विनोद तावडेंना देऊन पुणे भाजपची सगळी धुरा गिरीश बापटांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती. त्यामुळे भाजपची आणि विशेषतः गिरीश बापटांची प्रतिष्ठा आजच्या निकालात पणाला लागली आहे.

वर्चस्वाची लढाई

तिकडे लातूर जिल्ह्यात संभाजी पाटील निलंगेकरांना मंत्रीपद मिळाल्यावर निलंग्यात प्रथमच निवडणूक होतेय. त्यामुळे त्यांनीही आपली सारी ताकद निवडणुकीत झोकून दिलीय. स्वतः मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाच्या तीन दिवसीय सुट्टीत या निवडणुकीसाठी झंझावाती प्रचार सभा घेतल्या आहेत. त्यामुळे एकूणचं निवडणूक जरी स्थानिक स्वराज्य संस्थांची असली, तरी राजकीय वर्चस्वाची मोठी लढई यानिमित्तानं बघायाला मिळालीय.