नाना पाटेकरांनी मांडले, जात-धर्माबद्दल आपलं मत

 मी जात मानत नाही, मला धर्मही मान्य नाही, आपण भारतीय आहोत आणि भारतीयता हाच आपला धर्म आहे असे म्हणत हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन हे धर्म कशाला हवेत? या जगात येताना आपण धर्म सोबत घेऊन आलो होतो का? असे प्रश्न प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांनी उपस्थित केले आहेत.

Updated: Feb 10, 2016, 09:21 PM IST
नाना पाटेकरांनी मांडले, जात-धर्माबद्दल आपलं मत title=

सिंधुदुर्ग :  मी जात मानत नाही, मला धर्मही मान्य नाही, आपण भारतीय आहोत आणि भारतीयता हाच आपला धर्म आहे असे म्हणत हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन हे धर्म कशाला हवेत? या जगात येताना आपण धर्म सोबत घेऊन आलो होतो का? असे प्रश्न प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांनी उपस्थित केले आहेत.

क्रांतिवीर या चित्रपटात हिंदू-मुस्लिमांवर चित्रित केलेल्या दृश्याची नाना पाटेकर यांनी पुन्हा आठवण करून दिली.

सिंधुदुर्गातील आचरा न्यू इंग्लिश स्कूल या शाळेच्या शतकोमहोत्सवी सांगता समारंभात नाना पाटेकरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी नाना पाटेकर यांनी माणसांतील जात धर्मावर आधारीत भेदभावावर बोट ठेवले.

आपला भारत देश जर धर्मनिरपेक्ष आहे असे म्हणत असाल, तर मग प्रत्येक फॉर्मवर असलेला जात आणि धर्माचा कॉलम काढून का टाकत नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांसमोर ठेवला.

श्रम देवो भवः - नानाचा मंत्र

सर्वच धर्मातील श्लोक, कलमांचा अर्थ एकच असल्याचे नाना पाटेकरांनी यावेळी ठासून सांगितले. माणसाने माणसात देव शोधला पाहिजे, आपल्या ह्दयात देव असतो असे म्हणत, आपल्या कामाला देव माना असा मंत्रही नानांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.

माणसात नायक-खलनायक दोन्ही 

माणसात खलनायकही असतो आणि नायकही. मग खलनायक व्हायचे की नायक हे ज्याने त्याने ठरवायचे असते. आपण नायक होऊन आपल्यात असलेली माणुसकी जगवण्याचा आपण प्रयत्न केला, तर माणूस म्हणून जीवन जगल्याचे समाधान मिळेल असेही नाना पुढे म्हणाले.

कोकणातही 'नाम'च काम सुरू करणार 

कोकणातही नामच्या माध्यमातून काम करायचे आहे असा मनोदय नानांनी व्यक्त केला. भारताला स्वांतंत्र्य मिळाले असले तरी आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालेलो नाही. आपल्याकडे मूठभर असेल त्यातून चिमूटभर का होईना, पण दुसऱ्याला देण्याची दानत हवी असेही नाना पुढे म्हणाले.