'सामना'वर बंदी आणणार नाही, व्यंकय्या नायडू यांची सारवासारव

By Surendra Gangan | Last Updated: Friday, February 17, 2017 - 11:42
'सामना'वर बंदी आणणार नाही, व्यंकय्या नायडू यांची सारवासारव

पुणे : शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'वर बंदी आणणार नाही, अशी माहिती केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली.

दैनिक सामनामधून निवडणुकीचा प्रचार होत आहे. हा आचारसंहितेचा भंग असल्याचे भाजपकडून करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले होते. त्यानंतर शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर दिले होते.

दरम्यान, निवडणुकीत सामना वृत्तपत्रावर बंदी आणून दाखवाच असा इशारा उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या सभेत दिला होता. उभा महाराष्ट्र या विरोधात जाईल असे सांगत त्यांनी सरकारला आव्हान दिले. सामनावर आम्ही बंदी आणणार नाही, असं माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे भाजपला जोरदार घरचा आहेर मिळालाय.

16, 20 आणि 21 फेब्रुवारीला सामना छापू नये, असं पत्र भाजपनं निवडणूक आयोगाला दिलं होतं. त्यानंतर निवडणूक आयोगानं सामनालाही याबद्दल विचारणा केली होती. सामनावर बंदी आणून तर दाखवा, संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी काल नाशिकच्या सभेत दिलं होतं. त्यानंतर आज थेट प्रसारण मंत्र्यांनीच सामनावर अशी कुठलीही बंदी आणणार नसल्याचं स्पष्ट केले आहे.

सामना वृत्तपत्रातून उमेदवारांचा आणि पक्षाचा प्रचार होतो म्हणून निवडणूक आयोगाने नोटीस दिली होती. निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण मागविले होते.

त्यामुळे येत्या काळात राजकीय सामना रंगणार असे दिसते होते. आता व्यंकय्या नायडू यांनी सारवासारव करत बंदी आणणार नसल्याचे म्हटल्याने भाजप एक पाऊल मागे आल्याचे दिसत आहे.

First Published: Friday, February 17, 2017 - 10:26
comments powered by Disqus