पवार साहेब काय करताय हे बारामतीत?

जुलै संपत आला... अजूनही बारामती परिसरात पावसाची हजेरी नाही. दुष्काळाचं सावट आहे. पण याची जाण बारामतीतल्या जाणत्या राजांना आहे का? असा खरा प्रश्न आहे. माजी कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांच्या उदघाटन सोहळ्यात लाखो रूपयांची अक्षरशः उधळपट्टी करण्यात येत आहे. शेतकरी पाण्यासाठी दाही दिशा फिरतोय इथं मात्र जेवणावळी रंगतायत.

Updated: Jul 15, 2014, 09:07 PM IST
पवार साहेब काय करताय हे बारामतीत? title=

बारामती:  जुलै संपत आला... अजूनही बारामती परिसरात पावसाची हजेरी नाही. दुष्काळाचं सावट आहे. पण याची जाण बारामतीतल्या जाणत्या राजांना आहे का? असा खरा प्रश्न आहे. माजी कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांच्या उदघाटन सोहळ्यात लाखो रूपयांची अक्षरशः उधळपट्टी करण्यात येत आहे. शेतकरी पाण्यासाठी दाही दिशा फिरतोय इथं मात्र जेवणावळी रंगतायत.

पुणे जिल्ह्यातला पवार घराण्याचा बालेकिल्ला असलेला बारामती तालुका. जाणते राजे शरद पवार यांच्या या तालुक्यावर सध्या वरूणाची खप्पा मर्जी झालीय. इथल्या शेतात पाण्यावाचून कामं अडलीयत. परिसरावर भीषण पाणीटंचाई आहे. शेतकरी, सर्वसामान्य नाडलाय, पिचलाय... एकीकडे शेतकऱ्याची दैना झाली असताना, माजी कृषिमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री मात्र विविध विकासकामांच्या उद्घाटनात गुंतले आहेत. उद्घाटनांच्या नावाखाली लाखो रूपयांची उधळपट्टी सुरू होती. मोठमोठाल्या जेवणावळी घातल्या गेल्या.. कार्यकर्ते, पाहूणे यांची ने-आण करण्यासाठी शेकडो वाहनांचा ताफा फिरत होता. परिसर कोरडा पडलाय, पाण्याअभावी शेतकरी नाडला गेलाय आणि प्रशासन राज्यकर्ते मात्र ऐषआरामी जेवणावळी आणि उधळपट्टीत रंगलेत..

तालुक्यातल्या 9 गावांत आणि 122 वाड्या वस्त्यांवर 16 टँकर्सच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. गेल्यावर्षी या 15 जुलैपर्यंत तालुक्यात 60 टक्के पेरण्या झाल्या होत्या. यावर्षी ही आकडेवारी अर्ध्यावर आलीय. त्यामुळं प्रशासनही हवालदिल झालंय. 

पाण्याअभावी हाताला काम नाही, जनावरांना चारा नाही त्यामुळं शेतकरी वैतागलाय. चारा छावण्या पुन्हा सुरू करण्याची मागणी केली जातेय. 

2 वर्षांपूर्वी दुष्काळी परिस्थिती असताना भास्कर जाधवांच्या मुलीचं थाटात लग्न झालं म्हणून पवारांनी भास्कर जाधवांना जोरदार कानपिचक्या दिल्या होत्या. मात्र सध्या स्वतःच्याच तालुक्यातल्या दुष्काळी स्थितीचं भान जाणत्या राजांना आहे का? असा प्रश्न या सरकारी जेवणावळी पाहिल्यावर पडतोय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.