पंढरपूरच्या वारीत उत्साहाला उधाण

Last Updated: Wednesday, July 2, 2014 - 11:47
पंढरपूरच्या वारीत उत्साहाला उधाण

इंदापूर : जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज्यांच्या पालखीचं इंदापूरमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत झालं. तुकोबांच्या पालखीचं इंदापुरात गोल रिंगण सोहळा पार पडला. बेलवाडीनंतर इंदापूरात तुकोबारायांचं हे दुसरं गोल रिंगण इंदापुरमध्ये झालं.

डोईवर तुळशी वृंदावन घेत धावत्या महिला वारकरी, भगवा झेंडा हातात घेऊन धावते वारकरी आणि पालखीला प्रदक्षिणा घालणारा देवाचा अश्व... त्या अश्वामागे त्याच्या पायाखालची माती घेण्यासाठी धावणारे वारकरी असा डोळ्याचं पारणं फेडणारा रिंगण सोहळा इंदापूरात पार पडला. तुकोबारायांच्या पालखीचा मुक्काम इंदापुरात असून लाखो वारक-यांबरोबर समस्त इंदापुरकर तुकोबारायांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली.

पंढरपूरच्या वारीत वेगवेगळ्या दिंड्या पाहायला मिळतात. समाजातील अनेक पंथाचे, वर्गाचे लोक वारी या एका शब्दात एकत्र येतात...काही दिंड्या फक्त विठूरायाच्या दर्शनासाठी हा प्रवास करत असतात तर काही या दिंड्यांचा वारक-यांचा प्रवास सुखकर, आनंददायी आणि थोडासा मनोरंजक व्हावा यासाठी प्रवास करत असतात...त्यातच जर प्रबोधन करता आल तर सोन्याहून पिवळं.

संत तुकोबारायांचा पालखी सोहळा इंदापूर मुक्कामी पोहचला. या सोहळ्यात सातारा जिल्ह्यातील जय हनुमान प्रासादिक दिंडीत डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या पत्नी शैला आणि मुलगा हमीद यांनीही सहभाग घेतला.वारकरी सांप्रदायात डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्याविषयी चुकीचा संदेश पसरविणारांचे मत खोडून काढण्यासाठी दाभोलकर कुटुंबिया या सोहळ्यात सहभागी झाले होते. जादूटोणा विरोधी कायदा हा देव आणि धर्माच्या विरोधात नसल्यानेच पालखी सोहळा सुरळीतपणे सुरु असल्याचं अंनिसचे कार्यकर्ते प्रशांत पोतदार यांनी सांगितले.

संत तुकाराम महाराजांनी अंधश्रद्धेला बळी पडू नका अस प्रबोधन नेहमीच केले. हेच विचार डॉ. दाभोळकर यांनी समाजात रुजविण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच आम्ही भूलथापांना बळी पडलो नाही असं मत जय हनुमान प्रासादिक दिंडीचे प्रमुख डॉ. सुहास फडतरे यांनी व्यक्त केलंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

First Published: Wednesday, July 2, 2014 - 11:47
comments powered by Disqus