लोहगाव विमानतळालगतची बांधकामं एका वर्षाच्या आत हटवा - हायकोर्ट

हवाई दलाचा तळ असलेल्या लोहगाव विमानतळालगतची बांधकामं एका वर्षाच्या आत हटवा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत. त्यामुळे विमानतळ परिसरात राहणारे लाखो नागरिक या निर्णयानं बाधित होणार आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधल्या अवैध बांधकामांप्रमाणेच या भागातल्या अवैध बांधकामांचा प्रश्न आगामी काळात पेटणार आहे. 

Updated: Jun 10, 2015, 11:07 PM IST
लोहगाव विमानतळालगतची बांधकामं एका वर्षाच्या आत हटवा - हायकोर्ट title=

अरूण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे: हवाई दलाचा तळ असलेल्या लोहगाव विमानतळालगतची बांधकामं एका वर्षाच्या आत हटवा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत. त्यामुळे विमानतळ परिसरात राहणारे लाखो नागरिक या निर्णयानं बाधित होणार आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधल्या अवैध बांधकामांप्रमाणेच या भागातल्या अवैध बांधकामांचा प्रश्न आगामी काळात पेटणार आहे. 

लोहगाव विमानतळाभोवती असणाऱ्या या बांधकामांवर हातोडा पडण्याची शक्यता आहे. विमानतळाच्या सीमाभिंतीपासून १०० मीटर्स, तर बॉम्बडोमपासून ९०० मीटरपर्यंत कुठल्याही बांधकामांना परवानगी नाही. असं असताना या परिसरात हजारो बांधकामं उभी राहिली आहेत. विशेष म्हणजे यापैकी कित्येक इमारतींना महापालिका तसंच राज्य सरकारची रितसर परवानगी आहे. तर अनेक इमारती कोणतीही परवानगी न घेता सर्रास उभ्या राहिल्या आहेत. पुण्यात असलेल्या संरक्षण आस्थापनांच्या दृष्टीनं लष्कराचं हे लोहगाव विमानतळ महत्त्वाचं आहे. त्यामुळं या परिसरातल्या अवैध बांधकामांमुळं त्याला धोका असल्याची जनहीत याचिका दाखल करण्यात आली होती. ऑक्टोबर २००३ नंतर उभी राहिलेली बांधकामं तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयानं पुणे महापालिकेला दिले आहेत. मात्र यामुळे लाखो जण बेघर होणार आहेत. 

सुरूवातीला हवाई तळ बनवण्यासाठी काहीशे एकर, त्यानंतर हवाई तळाची सुरक्षा म्हणून काहीशे एकर जमीन इथल्या स्थानिकांना गमवावी लागलीय. संरक्षणाशी संबंधित विषय असल्यानं या जमिनी सरकारला देण्यास स्थानिकांचा विरोध नाही. मात्र योग्य मोबदला मिळावा तसंच निवासाची पर्यायी व्यवस्था व्हावी अशी स्थानिकांची मागणी आहे. 

अवैध बांधकाम असो वा आरक्षित जमिनींचा विषय.. जितका जटील तितकाच तो संवेधनशीलही आहे. म्हणूनच या प्रकरणी योग्य सुनावणी घेऊनच आदेशाची कार्यवाही करण्याच निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्याचप्रमाणे स्वतःचा काहीही दोष नसताना हजारो जणांवर बेघर होण्याची वेळ आलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.