रत्नागिरी नगरपरिषदेत रस्सीखेच, भाजपचा एकला चलोचा नारा

रत्नागिरी नगरपरिषद मोठी नगर परिषद म्हणून ओळखली जाते. त्यामुळे वर्चस्व निर्माण करण्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न सुरू झालेत. 

Updated: Oct 12, 2016, 12:10 AM IST
रत्नागिरी नगरपरिषदेत रस्सीखेच, भाजपचा एकला चलोचा नारा title=

रत्नागिरी : नगरपरिषद मोठी नगर परिषद म्हणून ओळखली जाते. त्यामुळे वर्चस्व निर्माण करण्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न सुरू झालेत. नगर परिषद निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात होताच रत्नागिरीच्या नगराध्यक्षांसह सगळेच नगरसेवक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात दंग झालेत.

रत्नागिरी शहराचा विकास भाजपनेच केल्याचा दावा करत निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे विद्यमान नगराध्यक्षांनी सांगितले. तर दुसरीकडे शहरातली कामे पूर्वीच्या शिवसेना नगराध्यक्षांनी मंजूर केल्याचा प्रचार करत शिवसेना करत आहे. तर शहराचा विकास शिवसेना-भाजपमुळेच खुंटल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला आहे. 

दरम्यान, रत्नागिरीत सद्यस्थितीत अनेक विकास कामं खोळंबली आहेत. शहरात पाण्याचं नियोजन नाही, पथदिवे कधीच पेटलेले दिसत नाही, कचरा गाडी वॉर्डमध्ये जात नाही. त्यामुळे साथीच्या रोगाचं साम्राज्य पसरलंय. शहरभर कुत्र्यांचा सुळसुळाट यासह असंख्य प्रश्न रत्नागिरीकरांना सतावत आहे.

हे सर्व प्रश्न सुटत नसल्यामुळे नागरिक नगरपरिषदेच्या कारभारावर चांगलेच नाराज आहेत. रत्नागिरी नगरपरिषदेत गेल्या विधानसभा निवडणुकीपासूनच शिवसेना भाजपचं पटत नाहीय. त्यामुळे देशात, राज्यात आणि नगरपरिषदेत युतीची सत्ता असतानादेखील विकास कामं अद्यापही जैसै थेच आहेत.