सराफा दुकानावर सशस्त्र दरोडा; दोन जण गंभीर जखमी

मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या एका सराफ दुकानावर काही अज्ञात दरोडेखोरांनी टाकला. यावेळी, दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत दोघे जण जखमी झालेत.

Updated: Oct 3, 2015, 12:20 PM IST
सराफा दुकानावर सशस्त्र दरोडा; दोन जण गंभीर जखमी title=

विशाल पाडाळे, लोणावळा : मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या एका सराफ दुकानावर काही अज्ञात दरोडेखोरांनी टाकला. यावेळी, दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत दोघे जण जखमी झालेत.

संध्याकाळी सातच्या सुमारास खांडगे आर्केड इमारतीजवळील कमला ज्वेलर्स या सराफ दुकानावर दहा ते बारा अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. मंगेश पालरेचा (वय 40) आणि मनोज पालरेचा (वय 45) हे दोघे या हल्ल्यात जखमी झालेत. 

यावेळी दुकानातील पालरेचा बंधूंना मारहाण करुन लूट केल्याचा प्रकार घडलाय. दरोडेखोरांकडे बंदूक व धारदार शस्त्रे असल्याची माहिती पुढे आलीय. दरोडेखोरांच्या मारहाणीत पालरेचा बंधू गंभीर जखमी झाले असून त्यांना सोमाटणे फाटा येथील पवना रुगणालयात दाखल करण्यात आलंय.   

दरोड्याच्या वेळी दोघे बंदूकधारी दरोडेखोर बाहेर पाळत देत थांबले होते तर बाकीचे सर्वजण दुकानात घुसले. त्यांनी दुकानातील पालरेचा बंधुना शस्त्राचा धाक दाखवून तसेच जबर मारहाण करुन दुकानातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला. यात पंचवीस ते तीस लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय 
 
दरोड्यानंतर हे सर्व लुटारु रेल्वे स्टेशनच्या दिशेने पळून गेले जाता जाता सराफाच्या दुकानावर गोळीबार केला त्यातून सराफ बचावले, व दरोडेखोरांकडे दोन बंदुका असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. तळेगाव पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. या घटनेमुळे तळेगाव परिसरात मोठी खळबळ उडालीय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.