संघर्ष यात्रा : गोपीनाथ मुंडे ते पंकजा मुंडे…

Last Updated: Thursday, August 28, 2014 - 21:02
संघर्ष यात्रा : गोपीनाथ मुंडे ते पंकजा मुंडे…
फाईल फोटो

मुंबई : भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी 1994-95 ला संघर्ष यात्रा काढली आणि महाराष्ट्र विधीमंडळावर भगवा फडकला... आता गोपीनाथ मुंडेंची मुलगी पंकजा मुंडे पुन्हा संघर्ष यात्रेला निघाली आहे... 2014च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्ताबदल होईल? पंकजा मुंडेंची संघर्ष यात्रा बदलाची नांदी ठरेल? राजकीय वर्तुळात सध्या सुरु आहे याच प्रश्नांची चर्चा...

महाराष्ट्रात रणसंग्राम सुरु झालाय... महाराष्ट्र विधीमंडळ काबिज करण्यासाठी घमासान युद्ध रंगतंय... प्रचाराची रणधुमाळी तुफान रंगायला लागली आहे... लक्ष्य एकच... महाराष्ट्र विधानसभा... 2014 ला सत्ताबदल करायचाच अशा निर्धार करुन भाजपच्या युवा नेत्या पंकजा मुंडे पुढे सरसावल्या आहेत. 


फाईल फोटो

सिंदखेडराजा ते चौंडी या 'पुन्हा संघर्ष यात्रे'वर पंकजा मुंडे निघाल्यात... सिंदखेडराजा वीरमाता जिजाऊंचं जन्मस्थान तर चौंडी आहे अहिल्याबाई होळकर यांचं जन्मस्थान... या दोन्ही वीरांगणांना आदर्श ठेवत त्या  राज्यातील सत्ताबदलाचा मार्ग शोधत आहेत. 
 
1994-95 मध्ये गोपीनाथ मुंडेंच्या शिवनेरी ते शिवतीर्थ संघर्ष यात्रेमुळं महाराष्ट्र पेटला होता. 2014 मध्ये गोपीनाथ मुंडेंची कन्या पंकजा मुंडे पुन्हा संघर्ष यात्रेला निघाली आहे. 
राज्यात 1995 मध्ये सत्ताबदल झाला होता तुफान राजकीय संघर्षाच्या अग्रभागी होते भारतीय जनता पार्टीचे लढाऊ नेते गोपीनाथ मुंडे... राज्यात 2014 मध्ये आता पुन्हा सत्ताबदलाची हवा आहे... आता गोपीनाथ मुंडेंची कन्या, पंकजा मुंडे वडिलांचा वारसा पुढे चालवते आहे. २०१४ सालीही काँग्रेस राष्ट्रवादी सरकारला सत्तेवरुन खाली खेचत राज्यात सत्ताबदल घडवण्याचं लक्ष्य भाजपसमोर आहे.

1995 मध्ये राज्यात काँग्रेसची सत्ता होती. मुख्यमंत्री शरद पवार होते. हुलकावणी देत असलेली सत्ता मिळवायचीच असा चंग बांधून त्यावेळी विरोधी पक्षनेते पदावर असलेल्या गोपीनाथ मुंडेंनी रान उठवलं होतं. 2014 मध्ये पंकजा मुंडेंचं लक्ष्य आहे ते राज्यातली काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचं सरकार... मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य करत पंकजा मुंडेंची पुन्हा संघर्ष यात्रा पुढे सरकतेय. 
 
1994-95 मध्य गोपीनाथ मुंडे विरुद्ध शरद विरुद्ध पवार असा सामना झाला... 2014 मध्ये पंकजा मुंडे विरुद्ध अजित पवार असा सामना रंगेल, अशी चिन्हं आहेत. 
 
1995 च्या रणधुमाळीत राज्यात सत्ता मिळवायची असेल तर मुख्य आव्हान शरद पवारांचं आहे याची गोपीनाथ मुंडेंना जाणिव होती.  शरद पवारांना आव्हान देणं सोपं नव्हतं. लढवय्या गोपीनांथ मुंडेंनी हे आव्हान स्विकारलं. राजकारणातले गुन्हेगारीकरण हा मुद्दा लावून धरत मुंडेंनी पवारांविरोधात रान उठवलं. गुन्हेगार आणि राजकारण्यांच्या अभद्र युतीवर मुंडेंनी तोफ डागली. नागपुरात झालेलं गोवारी प्रकरण असो की जळगाव सेक्स स्कॅन्डल... शेतकऱ्यांचे प्रश्न असोत की बेरोजगारी आणि कुपोषणचा प्रश्न गोपीनाथ मुंडेंनी काँग्रेस सरकारला जाब विचारत संघर्ष पेटता ठेवला.


फाईल फोटो

शरद पवारांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारला खाली खेचत भाजप सेना युती 1995 मध्ये  सत्तेत आली त्यात गोपीनाथ मुंडेंच्या संघर्ष यात्रेचा मोठा वाटा होता. 2014 मध्ये गोपीनाथ मुंडेंच्या अपघाती निधनानंतर पंकजा मुंडेंकडे आता नेतृत्वाचा वारसा आलाय... त्यांच्यासमोर आता लक्ष्य आहे राज्यातील काँग्रेस राष्ट्रवादीचं आघाडी सरकार..
 
पुन्हा संघर्ष यात्रा राज्यातल्या सत्ताबदलाची नांदी ठरेल? पुन्हा संघर्ष यात्रेनंतर राज्यात पंकजा मुंडेंचे नेतृत्व नवी उंची गाठेल? गोपीनाथ मुंडेचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. पण, पंकजा मुंडे राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतील? 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

First Published: Thursday, August 28, 2014 - 21:01
comments powered by Disqus