आलिशान गाडीत सुरू होतं चालतं-फिरतं गर्भलिंग चाचणी सेंटर!

हॉस्पीटल आणि सोनाग्राफी सेंटर्सवर कारवाईचा फास आवळल्यानंतर आता गर्भातल्या मुलींची हत्या करण्यासाठी हत्याऱ्यांनी नव्या युक्त्या शोधून काढल्यात. नुकतीच, एका आलिशान गाडीत गर्भलिंग चाचणी होत असल्याचं उघड झालंय. 

Updated: Jun 26, 2015, 01:04 PM IST
आलिशान गाडीत सुरू होतं चालतं-फिरतं गर्भलिंग चाचणी सेंटर! title=

कोल्हापूर : हॉस्पीटल आणि सोनाग्राफी सेंटर्सवर कारवाईचा फास आवळल्यानंतर आता गर्भातल्या मुलींची हत्या करण्यासाठी हत्याऱ्यांनी नव्या युक्त्या शोधून काढल्यात. नुकतीच, एका आलिशान गाडीत गर्भलिंग चाचणी होत असल्याचं उघड झालंय. 

पोलिसांनी केलेल्या कारवाईत कोल्हापूरमध्ये रंकाळ्याजवळ जुना वाशीनाका चौकात मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय. या निमित्तानं चालतं-फिरतं गर्भलिंग चाचणी आणि गर्भपात केंद्र कोल्हापुरात कार्यरत असल्याचं उघड झालंय. 

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका महागड्या गाडीत हा सगळा प्रकार दिवसा ढवळ्या सर्रास सुरू असल्याचं समोर आलं. पोलिसांनी या गाडीतून चीनी बनावटीचं सोनोग्राफी यंत्र हस्तगत केलंय. या कृत्यात समावेश असणाऱ्या दोन डॉक्टर्ससह कारच्या चालकाला अटक करण्यात आलीय. डॉ. हिंदूराव बाळासो पवार, डॉ. हर्षल रवींद्र नाईक अशी या डॉक्टर्सची नावं आहेत.  

डॉ. हिंदुराव पवार, डॉ. हर्षल नाईक आणि चालक सुशांत दळवी हे टोयाटो कॅमरी या अलीशान गाडीत गर्भलिंग निदान करत असल्याची माहिती जुना राजवाडा पोलीसांना मिळाली. त्यानंतर पोलीसांनी MH 09 AJ 9595 या गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये सोनोग्राफीचं साहित्य आढळून आलं. या तिघांना अटक करण्यात आली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलंय. पोलीसांनी गर्भलिंग प्रतिबंध सल्लागार समितीला याची माहिती दिलीय.

धक्कादायक म्हणजे, गर्भलिंग निदान रोखण्यासाठी कोल्हापुरात 'सायलेंट ऑब्जरव्हर' बसवण्यात आले होते... पण ते सायलेंटच आहेत... त्यामुळे राज्यात मुलींची हत्या थांबणार कशी? असा प्रश्न उपस्थित होतोय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.