खेळण्या-बागडण्याच्या वयात 'मुरळी'वर लादलं मातृत्व!

अहमदनगरच्या अकोलेमध्ये अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. खेळण्या बागडण्याच्या वयात या मुलीवर सक्तीचं मातृत्व लादण्यात आलंय... तिला अडीच महिन्याचं तान्हं बाळ आहे.

Updated: Dec 26, 2014, 01:13 PM IST
खेळण्या-बागडण्याच्या वयात 'मुरळी'वर लादलं मातृत्व! title=

अहमदनगर : अहमदनगरच्या अकोलेमध्ये अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. खेळण्या बागडण्याच्या वयात या मुलीवर सक्तीचं मातृत्व लादण्यात आलंय... तिला अडीच महिन्याचं तान्हं बाळ आहे.

पीडित मुलगी अवघ्या १३ वर्षांची आहे. धक्कादायक म्हणजे, नवस फेडण्याच्या नावाखाली पीडित मुलीच्या आजीने तिचं लग्न देवाशी लावलं होतं... मुरळी म्हणून तिला देवाला वाहण्यात आलं होतं. 

शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या हेरंब कुलकर्णी यांनी या मुलीला शाळेत दाखल करून घेण्याचादेखील प्रयत्न केला होता... मात्र, तिची आजी मात्र शिक्षणाला नकार देत तिला जागरण गोंधळाच्या कार्यक्रमांसाठी पाठवत होती. मुलीचे आई - वडील वीटभट्टीवर काम करतात. दुसरं लग्न केल्यामुळे ते परगावी राहतात. 

मुलगी गर्भार असल्याचं कळल्यावर हे कुणाला कळू नये यासाठी तिला डोंगराच्या कडेला एका खोपट्यात ठेवण्यात आलं होतं. अंधश्रद्धा निर्मूलन समिती व स्पार्क या संस्थांनी याबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी पीडित मुलगी व तिच्या आजीची चौकशी सुरु केली. तेव्हा या मुलीच्या हातात अडीच महिन्यांचं बाळंही दाखल झालं होतं.

संबंधित मुलीला सध्या महिला सुधारगृहात पाठवण्यात आलंय. याप्रकरणी पीडित मुलीच्या आजीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दोषींवर देवदासी प्रतिबंधक कायदा २००५ तसेच बालकांचे लैंगिक शोषण २०१२ यातील तरतुदीनुसार कारवाई व्हावी, अशी सामाजिक संस्थांची मागणी आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.