परीक्षा केंद्राजवळ घुटमळणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई

राज्यात बारावीच्या पेपरफुटीचे आणि कॉपीचे प्रकार उघडकीला येत आहेत. नाशिक जिल्हा प्रशासनाने त्याची धास्ती घेतलीय

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 8, 2017, 09:25 PM IST
परीक्षा केंद्राजवळ घुटमळणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई title=

नाशिक : राज्यात बारावीच्या पेपरफुटीचे आणि कॉपीचे प्रकार उघडकीला येत आहेत. नाशिक जिल्हा प्रशासनाने त्याची धास्ती घेतलीय. परीक्षा केंद्रांजवळ कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. परीक्षा केंद्राजवळ घुटमळत राहणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश देण्यात आलेत. परीक्षा कालावधीत शिक्षक आणि कर्मचारी वर्गाला मोबाईलही बाळगण्यास बंदी करण्यात आलीय.

दहावी बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. मात्र बारावीच्या परीक्षेला यावेळी पेपरफुटीचं ग्रहण लागलं. त्यामुळे एकच खळबळ माजली. त्यामुळे आता जिल्हा प्रशासन सतर्क झालंय. जिल्हा प्रशासनाने परीक्षा केंद्रावर अनोळखी, अनधिकृत व्यक्तींना प्रवेशबंदी केलीय. त्याचसोबत परीक्षा केंद्राच्या आवारात घुटमळत राहणाऱ्या व्यक्ती, परीक्षार्थी, कॉपीचं साहित्य पुरवणारे यांच्यावर करडी नजर राहणार आहे. अनधिकृत व्यक्ती, वाहनं यांना परीक्षा केंद्राच्या बाजूला 200 मीटरवरच रोखलं जातंय. 

जिथे जिथे पेपर फुटलेत त्या ठिकाणी केंद्रावरील कर्मचारी वर्गावर संशय घेतला जातोय. त्यामुळे प्रशासनाने चांगलीच धास्ती घेतलीय. परीक्षा केंद्राजवळ मोबाईल फोन, कॉडलेस फोन, झेरॉक्स मशिनच्या वापरावर बंदी घालण्यात आलीय. परीक्षा काळात सुपरवायझर, शिक्षक, कर्मचारी यांचे मोबाईल जमा करून घेतलेत. 

नाशिक जिल्ह्यातील पेठ-सुरगाणा,  सटाणा , सिन्नरसह इतर ग्रामीण भागातील संवेदनशील परीक्षा केंद्रावर अतिरक्त पोलीस बदोबस्त  तैनात करण्याचे आणि भरारी पथकाला जादा कुमक देण्याचे आदेश जारी  करण्यात आलेत. आतापर्यंत १८ हून अधिक कॉपी बहाद्दरांना पकडण्यात शिक्षण विभागाला यश आलंय. मात्र कॉपीचे प्रकार थांबवण्यात प्रशासन अजूनही अपयशी ठरलंय. कॉपी पुरवण्यात पालक, शिक्षक, कर्मचारी यांचा काही ठिकाणी सहभाग असल्याच्या चर्चा सुरु असल्याने शिक्षण क्षेत्रासाठी ही चिंतेची बाब आहे.