तासगाव पोटनिवडणूक : राष्ट्रवादीकडून आर.आर. यांच्या पत्नीला उमेदवारी

 तासगाव विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून आर.आर.पाटील यांच्या पत्नी सुमनताई यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे. सुमनताई पाटील १७ मार्चला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Updated: Mar 14, 2015, 07:58 PM IST
तासगाव पोटनिवडणूक : राष्ट्रवादीकडून आर.आर. यांच्या पत्नीला उमेदवारी  title=

सांगली : तासगाव विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून आर.आर.पाटील यांच्या पत्नी सुमनताई यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे. सुमनताई पाटील १७ मार्चला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर आर पाटील यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. या जागेवर आबांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिल्यास भाजप आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. 

तासगाव मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी पुढील महिन्यात ११ तारखेला मतदान होणार असून, १५ एप्रिलला मतमोजणी होणार आहे. यापूर्वी गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघात प्रीतम मुंडेंविरोधात राष्ट्रवादीने उमेदवार दिला नव्हता. त्याचप्रमाणे तासगावमध्ये आर. आर. पाटील यांच्या परिवारातील उमेदवाराविरोधात भाजप उमेदवार देणार नसल्याची माहिती भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनी दिली आहे.

तसेच आर आर पाटील यांच्या परिवारातील कुणी तासगावच्या पोटनिवडणूक लढणार असेल, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना निवडणूक लढणार नाही, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींनी सांगितले. आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता हीने विधानसभा निवडणुकीत आर. आर. यांच्या प्रचाराची सारी सूत्रे हाताळली होती. मात्र, निवडणूक लढविण्यासाठी वय कमी पडत असल्याने सुमनताई यांना उमेदवारी देण्याचे राष्ट्रवादीने निश्चित केले. तसे अजित पवार  यांनी जाहीर केले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.