आनंदाची बातमी!, 3 महिन्याचा रूद्र आईसह बचावला

माळीण गावात झालेल्या दुर्घटनेत प्रत्येक घरात मनुष्य हानी झालीय. मात्र लिंबे कुटुंबियांच्या घरात आश्चर्यकारकरित्या सगळे बचावले. विशेष घरातल्या एका तीन महिन्यांच्या बाळाने अक्षरशः काळावर मात केलीय.

Updated: Jul 31, 2014, 10:07 PM IST
आनंदाची बातमी!, 3 महिन्याचा रूद्र आईसह बचावला title=

पुणे : माळीण गावात झालेल्या दुर्घटनेत प्रत्येक घरात मनुष्य हानी झालीय. मात्र लिंबे कुटुंबियांच्या घरात आश्चर्यकारकरित्या सगळे बचावले. विशेष घरातल्या एका तीन महिन्यांच्या बाळाने अक्षरशः काळावर मात केलीय.

चमत्कार.. नशीब...या शब्दांवर विश्वास ठेवावा का..असा प्रश्न नेहमी सतावतो.. पण या छोट्याशा तीन महिन्यांच्या रूद्रकडे पाहिलं की, या शब्दांवर विश्वास बसेल असं वाटतं.

माळीण या गावातल्या लिंबे कुटुंबियांचा नातू.. रूद्र.. भीमाशंकर परिसरातल्या माळीण गावात जन्मलेल्या या मुलाचं नाव ठेवलं. रूद्र.. मात्र त्याचं नाव ठेवताना आपला हा मुलगा निसर्गाच्या रूद्रावतारालाही मात देणार आहे हे लिंबे कुटुंबियांच्या मनातही नसेल.

सकाळी आठ ते दुपारी साडेचार या काळात रूद्र त्याच्या आईसोबत ढिगा-याखाली अडकला होता. मात्र एनडीआरएफच्या जवानांनी त्याला ढिगा-याखालून बाहेर काढलं. अगदी सहीसलामत. 
 
रूद्रचे आईबाबा आजी आजोबा वाचले. मात्र लिंबे यांचे अनेक नातेवाईक या दुर्घटनेत बळी गेलेत.
 
देव तारी त्याला कोण मारी ही म्हण रूद्रकडे पाहिल्यावर पटते. आईला बिलगून असलेल्या रूद्रला निसर्गाचा रूद्रावतारही काहीही करू शकला नाही. माळीणच्या रूपात महाराष्ट्रावर कोसळलेल्या दुःखातही ही छोटीशी हिरवळ मनाला दिलासा देऊन जातेय. 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.