गुंठाभरही जमीन नाही पण, 118 कोटींची उडीद खरेदी

शेतकऱ्यांचं भलं करण्याच्या गप्पा मारणारेच अधिकाऱ्यांना हाताशी धरून कसे घोटाळे करतात, याचा इरसाल नमुना बीडमध्ये समोर आलाय. 

Updated: Jul 18, 2014, 08:54 PM IST
गुंठाभरही जमीन नाही पण, 118 कोटींची उडीद खरेदी  title=

बीड (लक्ष्मीकांत रूईकर, प्रतिनिधी) : शेतकऱ्यांचं भलं करण्याच्या गप्पा मारणारेच अधिकाऱ्यांना हाताशी धरून कसे घोटाळे करतात, याचा इरसाल नमुना बीडमध्ये समोर आलाय. 

ज्यांच्या नावावर गुंठाभरही जमीन नाही, ते उडिदाचं पीक घेतल्याचं कागदोपत्री दाखवून फसवत आहेत. बाजार समिती, मार्केंटींग फेडरेशन, तलाठी मंडळ अधिकारी अशा 350 अधिकारी, पुढाऱ्यांनी मिळून तब्बल 118 कोटींचा उडीद बोगस खरेदी घोटाळा केलाय. या सर्वांसह तब्बल 1600 जणांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पणन संचालकांनी दिलेत.

बीड आणि गेवराई इथे शासकीय हमीभाव केंद्रावरील उडीद खरेदीत कोट्यवधी रूपयांचा गैर व्यवहार झाला होता. या प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानुसार गैरव्यवहाराशी संबंधीत 350 अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. नऊ महिन्यांपासून प्रलंबित प्रकरणावर कारवाई होत असल्यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

बीड जिल्ह्यात नाफेडच्या उडीद खरेदीमध्ये भ्रष्टाचाराबाबत आमदार अमरसिंह पंडीत आणि धनंजय मुंडे यांनी तक्रार केली होती. या भ्रष्टाचाराबाबत विधान परिषदेमध्ये लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात आली होती. या लक्षवेधी सूचनेवर पणन राज्यमंत्र्यांनी 2 एप्रिल 2013 या दिवशी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी अहवाल सादर केला. या प्रकरणावर गुन्हे अन्वेषण विभागातर्फे चौकशी करण्याचा अभिप्राय जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता, अशी माहिती तक्रारदार अजित देशमुख यांनी दिलीय. 

2013 मध्ये नाफेडच्या खरेदी केंद्रावर 29 हजार क्विंटल उडीद खरेदी झाली होती. 2014 मध्ये मात्र केवळ 324 क्विंटल खरेदी झाल्यामुळे दोन वर्षातली ही तफावत पाहता गैरव्यवहाराला पुष्टी मिळते. एकूणच संबंधीत 1600 जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेत. त्यामुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.