अख्ख्या गावानं केलं अस्वलाचं बाळंतपण!

एखाद्या वन्य प्राण्याने गावात घुसून धुडगूस घातल्याच्या घटना आपण नेहमीच पाहतो... मात्र, एका मादी अस्वलाने गावातल्या कोंडवाड्यात पिल्लांना जन्म दिल्याची घटना भंडाऱ्याच्या आतेगावात घडलीय... विशेष म्हणजे त्या अस्वलाचं बाळंतपण सध्या अख्खं गाव एन्जॉय करतंय.

Updated: Nov 18, 2015, 11:30 PM IST
अख्ख्या गावानं केलं अस्वलाचं बाळंतपण! title=

माधव चंदनकर, भंडारा : एखाद्या वन्य प्राण्याने गावात घुसून धुडगूस घातल्याच्या घटना आपण नेहमीच पाहतो... मात्र, एका मादी अस्वलाने गावातल्या कोंडवाड्यात पिल्लांना जन्म दिल्याची घटना भंडाऱ्याच्या आतेगावात घडलीय... विशेष म्हणजे त्या अस्वलाचं बाळंतपण सध्या अख्खं गाव एन्जॉय करतंय.

भंडारा जिल्ह्यातल्या आतेगावातले गावकरी सध्या अस्वल लीलांचा आनंद घेताना दिसतायत. आतेगावचे उपसरपंच वसंता हटवार यांच्या मालकीच्या कोंडवाड्यात ऐन दिवाळीच्या दिवशी एका मादी अस्वलाने चक्क तीन पिलांना जन्म दिला. कोंडवाड्यात अस्वलानं ठाण मांडल्याचं कळल्यानंतर हटवार कुटुंबियांची सुरूवातीला भंबेरी उडाली. मात्र, आता तिची पिल्लं मोठी होईपर्यंत त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी हटवार कुटुंबीय आणि अख्ख्या गावानंच उचललीय.

नागझिरा अभयारण्याला लागून असलेल्या गावांमध्ये वन्य प्राण्यांचा त्रास नेहमीच सहन करावा लागतो. त्यामुळं गावकरी कायम हैराण असतात. मात्र एखाद्या वन्यजीवासाठी अख्ख्या गावानं मायेचं पांघरूण घातल्याचं उदाहरण इथं पाहायला मिळतंय.

एकीकडं बेसुमार जंगलतोडीमुळं वन्यप्राणी मनुष्यवस्तीत घुसून उपद्रव माजवत असल्याच्या घटना वाढल्यात. तर दुसरीकडं अस्वलासारख्या वन्य प्राण्याचं बाळंतपण करून आतेगावनं नवा आदर्श निर्माण केलाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.