'सख्खे' शेजारी असे बनतात 'पक्के' वैरी!

तुमच्या घरातून बाहेर पडण्याचा मार्गच कुणी बंद करून टाकला तर...? नुसत्या कल्पनेनंच अंगावर काटा उभा राहतो. पण सांगलीतल्या एका कुटुंबावर त्यांच्या शेजाऱ्यांनीच ही आफत आणलीय. दुर्दैव म्हणजं आपल्या सुटकेसाठी हे कुटुंब टाहो फोडतंय. पण गृहमंत्री आर. आर. पाटलांच्या जिल्ह्यातच पोलीस खातं आणि पालिका प्रशासन ढिम्म बसून आहे.

Updated: Jul 10, 2014, 08:23 AM IST
'सख्खे' शेजारी असे बनतात 'पक्के' वैरी! title=

सांगली: तुमच्या घरातून बाहेर पडण्याचा मार्गच कुणी बंद करून टाकला तर...? नुसत्या कल्पनेनंच अंगावर काटा उभा राहतो. पण सांगलीतल्या एका कुटुंबावर त्यांच्या शेजाऱ्यांनीच ही आफत आणलीय. दुर्दैव म्हणजं आपल्या सुटकेसाठी हे कुटुंब टाहो फोडतंय. पण गृहमंत्री आर. आर. पाटलांच्या जिल्ह्यातच पोलीस खातं आणि पालिका प्रशासन ढिम्म बसून आहे.

सख्खे शेजारी, पक्के वैरी... अशी म्हण का पडली असावी, हे पाहायचं असेल तर सांगली जिल्ह्यातल्या मिरज शहरात ब्राह्मणपुरी परिसरात राहणाऱ्या नारायण सावंत यांच्या घरी जायला हवं... पण त्यांच्या घरी तुम्ही जाणार तरी कसे..? कारण त्यांच्या घरी जाणारी वाटच शेजारी राहणाऱ्या जाधव कुटुंबियांनी बंद करून टाकलीय. बेकायदेशीरपणे... दगड आणि फाटक टाकून... झी मीडियाची टीम जेव्हा घटनास्थळी पोहोचली तेव्हा जाधव कुटुंबियांच्या अरेरावीचा सामना आम्हालाही करावा लागला. बेकायदेशीर अतिक्रमण करणारे किसन जाधव यांचे जावई गंगाराम चौगुले यांनी शुटिंगला मज्जाव केला.

आमच्या टीमनं इतरांच्या घरांच्या छतावर चढून, कसंबसं सावंत कुटुंबियांचं घर गाठलं... गेल्या दहा दिवसांपासून वयोवृद्ध नारायण सावंत आणि त्यांचं अख्खं कुटुंब घरात अडकून पडलंय. आता तर घरातलं धान्यही संपणार असल्यानं कुटुंबावर उपासमारीची पाळी आलीय.

झी मीडियाची टीम सावंत कुटुंबियांशी संवाद साधत असताना, जाधव कुटुंबीय पुन्हा एकदा अरेरावी करायला आले...दहा दिवसांपासून स्वतःच्याच घरात अडकून पडलेल्या सावंत कुटुंबियांनी या प्रकाराबाबत महापालिका आणि पोलिसांकडे मदतीची याचना केली. मात्र पालिका आणि पोलीस एकमेकांवर जबाबदारी ढकलून वेळकाढूपणा करत आहेत. तहसिलदारांनी पालिका उपायुक्तांना अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिलेत, मात्र पोलीस बंदोबस्ताची ते वाट बघतायत. तर लेखी आदेश मिळालेले नाहीत, असं सांगून पोलीस चालढकल करतायत...

गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या सांगली जिल्ह्यातली ही परिस्थिती... महाराष्ट्र तंटामुक्त करण्याचे ढोल वाजवणाऱ्या आर. आर. आबांच्या जिल्ह्यातच तंटामुक्तीचे कसे वाभाडे निघतायत, याचं हे ताजं उदाहरण... निदान यात प्रकरणात तरी लक्ष घालून आर. आर. आबा हा तंटा मिटवतील का?

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.