उमेदवारांबरोबर फिरतात, प्रचार करतात विरोधकांचा - अजितदादा

बंडखोरी मागे घेतलेले कार्यकर्ते फिरतात पक्षाच्या उमेदवाराबरोबर आणि प्रचार करतात विरोधकांचा असा अनुभव असल्याचं अजित पवारांनीच सांगितलं आहे. खडकवासल्याच्या पराभवातून हा धडा शिकल्याची कबुली त्यांनी दिली आहे.

Updated: Feb 9, 2012, 11:34 PM IST

www.24taas.com, पुणे

 

पुण्यामध्ये सगळ्याच पक्षांना बंडखोरीनं ग्रासलं आहे. ही बंडखोरी थोपवण्याचे प्रयत्न आजही काँग्रेसकडून सुरू आहेत, तर अनेक ठिकाणी बंडखोरी न थोपवणंच पक्षासाठी फायद्याचं ठरु शकतं, अशी भूमिका राष्ट्रवादीनं घेतली आहे. खडकवासल्याच्या पराभवातून राष्ट्रवादीनं हा धडा शिकला आहे.

 

पुण्यातली नेतृत्वहीन काँग्रेस बंडखोरीनं हैराण आहे. महापालिकेच्या ७६ पैकी ३३ प्रभागांमध्ये इच्छुकांनी बंडखोरी केली आहे. पक्षातल्या एकूण बंडखोरांची संख्या पन्नासपेक्षा जास्त आहे. यापैकी दहा ते बारा उमेदवार पक्षासाठी अतिशय त्रासदायक ठरु शकतात. बंडखोरांना थोपवण्याचे प्रयत्न पक्षाकडून सुरू आहेत.

 

राष्ट्रवादीची अवस्थाही काही वेगळी नाही. गम्मंत म्हणजे बंडखोरांना बंडखोरी करु देणंच काही ठिकाणी पक्षासाठी फायदेशीर असल्याचं अजित पवारांचं मत आहे. बंडखोरी मागे घेतलेले कार्यकर्ते फिरतात पक्षाच्या उमेदवाराबरोबर आणि प्रचार करतात विरोधकांचा असा अनुभव असल्याचं अजित पवारांनीच सांगितलं आहे. खडकवासल्याच्या पराभवातून हा धडा शिकल्याची कबुली त्यांनी दिली आहे.

 

शिवसेना आणि भाजपलाही बंडखोरीची लागण झाली आहे. भाजपनं काही बंडखोरांना पक्षातून निलंबित केलं आहे. शिवसेनेकडून अजून कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. बंडखोरांचं पुढे काय होईल, ते आज सांगता येणार नाही. मात्र ते निवडणुकीत धोक्याचे आणि निवडून आले तर फायद्याचे ठरु शकतात, ही बाबही राजकीय पक्ष जाणून आहेत.