आघाडीचा आज संयुक्त जाहीरनामा - Marathi News 24taas.com

आघाडीचा आज संयुक्त जाहीरनामा

www.24taas.com, मुंबई
जिल्हा परिषद निवडणुकीत आक्रमकपणे टीका करणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आजपासून महापालिका निवडणुकीसाठी हातात हात घालून प्रचार करणार आहेत. मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा संयुक्त जाहीरनामा आज प्रकाशित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
 
परवापर्यंत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकमेकांची उणीदुणी काढत राज्यभर प्रचारदौरे करत होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी अगदी खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांवर टीकाटिप्पणी केली. आता मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांचे नेते एकत्र येत आहेत. आज संयुक्त जाहीरनामा प्रकाशित केल्यानंतर उद्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांची मुंबईत एक प्रचारसभाही होणार आहे.
 
या सभेला शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, छगन भुजबळ, आर.आर.पाटील, आदी नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत ऐकमेकांना लाखोली वाहणाऱ्या नेत्यांची ही दिलजमाई पाहणं औत्सुकाचं ठरेल.

First Published: Wednesday, February 08, 2012, 11:43


comments powered by Disqus