पवार... 'दी पॉवर गेम'

राष्ट्रपतीपदाचे युपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जींनी काल मातोश्रीवर जाऊन बाळासाहेब ठाकरेंचे आभार मानले. प्रणवदांच्या या भेटीमुळे भाजपमधील अस्वस्थता वाढलीए. पण दुसरीकडे शरद पवारांनीही ही भेट घडवून शिवसेनेशी आपली मैत्री अधिक घट्ट केलीए.

Updated: Jul 14, 2012, 09:08 AM IST

 www.24taas.com, मुंबई

राष्ट्रपतीपदाचे युपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जींनी काल मातोश्रीवर जाऊन बाळासाहेब ठाकरेंचे आभार मानले. २५ मिनिटं चाललेल्या या भेटीत काय चर्चा झाली हे समजू शकलं नाही. मात्र प्रणवदांच्या या भेटीमुळे भाजपमधील अस्वस्थता वाढलीए. पण दुसरीकडे शरद पवारांनीही ही भेट घडवून शिवसेनेशी आपली मैत्री अधिक घट्ट केलीए.

 

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणीत एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा न देता शिवसेनेनं युपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जींना पाठिंबा देऊन भाजपला धक्का दिला होता. तर बाळासाहेब आणि  प्रणव मुखर्जीं यांच्यात झालेल्या भेटीनं भाजपमधील अस्वस्थता आणखी वाढलीए. मागील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं मराठीच्या मुद्द्यावर त्यावेळच्या युपीएच्या उमेदवार प्रतीभा पाटील यांना पाठिंबा देऊन एनडीएविरोधात भूमिका घेतली होती. तर यावेळीही शिवसेना एनडीए विरोधात गेलीए. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे भाजप आणि शिवसेनेतील दरी आणखीनच ऱुंदावलीए. संसदेवर हल्ला करणारा दहशतवादी अफजल गुरुचा फाशीचा विषय राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहे. त्याचबरोबर अनेक वर्षे प्रलंबित असणारा बेळगाव प्रश्न सुटावा अशी शिवसेनेची भूमिका आहे. त्यामुळे या दोन मुद्यांवर प्रणव मुखर्जीं-शिवसेनाप्रमुखांची चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. मात्र दोघांमध्ये काय चर्चा झाली ते उघड करण्यास बाळासाहेबांनी नकार दिलाय.

 

प्रणव मुखर्जी आणि बाळासाहेब यांची भेट घडवण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावलीए. राष्ट्रवादीचेच नेते असलेले पी.ए. संगमा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात असताना त्यांचीच कन्या अगाथा संगमा काँग्रेस आघाडीसरकारतर्फे राज्यमंत्री आहेत. संगमाच्या उमेदवारीनंतरही राष्ट्रवादीने अगाथा संगमांवर कारवाई केलेली नाही. त्यामुळे काँग्रेसकडून पवारांकडे संशयाच्या नजरेनं पाहिलं जात होतं. मात्र बाळासाहेब आणि प्रणवदांची भेट आणि महाराष्ट्रातील त्यांच्या दौ-यात पवारांची असलेली उपस्थिती या दोन गोष्टी साधून पवारांनी आपल्यावरील संशयाचं धुकं दूर करण्याचा प्रयत्न केलाय. तर दुसरीकडे शिवसेनेशी आणखीन जवळीक वाढवत भाजप आणि शिवसेनेतील दरी आणखी कशी वाढेल असा प्रयत्न केलाय. त्याचबरोबर शिवसेनेनं पाठिंबा जाहीर केल्यानंतरही काँग्रेसने राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीचा अर्ज भरतांना अनुमोदक म्हणून शिवसेनेच्या कुठल्याही खासदाराची किंवा प्रतिनिधीची सही घेतली नव्हती. मात्र पवारांनी ही भेट घडवून आणून शिवसेनेचंही महत्त्व वाढवलंय. त्याचबरोबर युपीएचे नवे संकटमोचक म्हणूनही आपली भूमिका ठळकपणे पुढे आणण्याचा प्रयत्न पवारांनी केलाय. अशा प्रकारे पवारांनी एका दगडात अनेक पक्षी मारलेत.