मुंबईची 'बेस्ट' तोट्यात

मुंबईची लाईफलाईन बेस्ट आता तोट्यात असल्याचं उघड झालंय. बेस्ट परिवहनाच्या 507 बसमार्गांपैकी एकही मार्ग नफ्यात नसल्याची धक्कादायक बाब बेस्टच्या वर्धापनदिनी समोर आलीय.

Updated: Aug 9, 2012, 11:04 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबईची लाईफलाईन बेस्ट आता तोट्यात असल्याचं उघड झालंय. बेस्ट परिवहनाच्या 507 बसमार्गांपैकी एकही मार्ग नफ्यात नसल्याची धक्कादायक बाब बेस्टच्या वर्धापनदिनी समोर आलीय.

 

बेस्टच्या 4700 बसेस दररोज रस्त्यांवर धावतात. प्रत्येक बसमागे प्रवाश्यांच्या संख्येत घट झालीय. बसवरती होणारा खर्च वाढलाय पण उत्पन्न कमी झालंय. मार्च 2012 च्या वेस्ट वाहतूक अहवालानुसार 507 मार्गांपैकी एकही मार्ग फायद्यात नसल्याचं उघड झालंय. बेस्टनं प्रत्येक किलोमीटरमागे एका रुपयानं वाढ केली असली तरी बेस्ट बस सेवा तोट्यात आहे. बेस्टच्या या तोट्याला शिवसेना-भाजप युती जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येतोय.

 

बेस्टच्या बसेस जास्त असल्या तरी त्यामानानं प्रवाश्यांची संख्या वाढलेली नाही. दुपारच्या वेळेला बसमध्ये फारसे प्रवासी नसतात. वाहतूक कोंडीत बसेस अडकल्यानं प्रवासी रिक्षांचा वापर करतात. लांब पल्ल्यांच्या मार्गावरच्या बसेससाठी प्रवासी मिळत नाहीत.

 

बेस्टकडे 2006-07 मध्ये 3400 गाड्या होत्या आणि प्रत्येक बसमागे प्रवाश्यांची संख्य़ा होती 1337... आता 2012 मध्ये बसेसची संख्या 4700 झाली पण प्रवाश्यांची संख्या फक्त 969 इतकी झालीय. बेस्ट तोट्यात जातेय, हे दाखवणारी ही आकडेवारी.... ही आकडेवारी गंभीरतेनं घेऊन संबंधितांनी वेळीच योग्य पावलं उचलण्याची गरज आहे.