संप मागे घ्या, अन्यथा कारवाई - टोपे

गेल्या दीड महिन्यांपासून संपावर गेलेल्या प्राधापकांनी संप मागे घेतला नाही तर कारवाई करू असा इशारा उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. ते 'झी २४ तास'शी बोलत होते.

Updated: May 12, 2012, 01:12 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

गेल्या दीड महिन्यांपासून संपावर गेलेल्या प्राधापकांनी संप मागे घेतला नाही तर कारवाई करू असा  इशारा उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे  यांनी दिला आहे. ते 'झी २४ तास'शी बोलत होते.

 

गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असेलल्या प्राध्यपकांच्या संपावर तोडगा निघण्याचं चिन्ह अद्याप दिसत नाहीत. सरकार जोपर्यंत लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही अशी भूमिका संपकरी प्राध्यापकांनी घेतलीय. तर लेखी आश्वासन द्यायला आपली काहीच हरकत नाही उलट प्राध्यापकच सरकारवर अविश्वास दाखवत असल्याचं  राजेश टोपे यांनी म्हंटल आहे. संप मागे घेतला नाही तर कारवाई करण्याचा इशाराही टोपे यांनी दिलाय.

 

सेट-नेटबाधित शिक्षकांची मान्यता आणि सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी याबाबत  सरकारनं दिलेल्या आश्वासनानंतरही प्राध्यापकांनी संप मागे घेण्यास नकार दर्शवलाय. दहा महिन्यांची वेतन थकबाकी जून २०१२  आणि एप्रिल २०१३ मध्ये देऊ, असं आश्वासन सरकारनं दिले आहे.

 

'एमफुक्टो' या प्राध्यापकांच्या संघटनेला हा पर्याय मान्य नाहीये. त्यामुळं सरकारनंही आता कठोर पाऊल उचलण्याचं ठरवलंय. कामावर हजर न होणा-या प्राध्यापकांवर संबंधित विद्यापीठातर्फे कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आलाय.