अंधेरीत इमारतीवरून कोसळून महिलेचा मृत्यू

अंधेरीच्या चार बंगला परिसरातील सागर संजोग इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन पडल्यामुळे रेणू अझवानी या ६३ वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला.

Updated: Feb 13, 2012, 01:02 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

अंधेरीच्या चार बंगला परिसरातील सागर संजोग इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन पडल्यामुळे रेणू अझवानी या ६३ वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला.

 

दुपारी सव्वादोनच्या सुमारास कपडे वाळत घालत असताना तोल जाऊन रेणू अझवानी खाली पडल्या. उंचावरुन पडल्यामुळे त्यांचा लगेच मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली . अझवानी यांचे घर आतून बंद होते. दरवाजा उघडून आत प्रवेश केल्यानंतर खिडकीजवळ वाळत घालण्यासाठीचे ओले कपडे दिसले. त्यामुळे अपघाती मृत्यू असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

 

रविवारची दुपारची वेळ असल्यामुळे परिसरात शांतता होती. मोठा आवाज ऐकू आला. आवाजाच्या दिशेने जाऊन पाहिल्यावर रक्ताच्या थोराळ्यात रेणू अझवानी दिसल्या, असे इमारतीच्या रखवालदाराने आणि अझवानी यांच्या शेजाऱ्यांनी सांगितले.

 

रेणू अझवानी यांचे कोणाकडे विशेष येणेजाणे नव्हते. त्यांचा कोणाशी मतभेद असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळलेले नाही. मात्र मागील काही दिवसांपासून अझवानी मानसोपचार घेत असल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीआधारे चौकशी करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र प्रथमदर्शनी अझवानी यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे दिसते, असे परिमंडळ नऊचे पोलिस उपायुक्त प्रताप दिघावकर यांनी सांगितले.