आयपीएल संगे, रेव्ह पार्टी रंगे!

Last Updated: Monday, May 21, 2012 - 14:08

www.24taas.com, मुंबई

 

मुंबईतल्या रेव्ह पार्टीत आणखी एक नवा खुलासा समोर आलाय. या रेव्ह पार्टीत आयपीएलचे दोन नव्हे तर सहा खेळाडू होते. मात्र पोलिसांच्या रेडपूर्वीच इतर चार खेळाडू पसार झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे पुणे वॉरियर्स संघातला फास्ट बोलर वेन पॉर्नेल आणि स्पिनर राहुल शर्मा हे दोघेच जण पोलिसांच्या हाती लागले.

 

दरम्यान, मुंबईत जुहूच्या ओकवूड हॉटेलमधल्या रेव्ह पार्टीप्रकरणी हॉटेलचा डायरेक्टर विषय हांडा याला अटक करण्यात आली आहे. हांडा यानंच ही पार्टी आयोजित केल्याचं उघड झाल्यानं एनडीपीएस कायद्यांतर्गत अटक करण्यात आलीय. हांडानं रेव्ह पार्टीचं इन्व्हीटेशन फेसबूकवरून पाठवल्याचंही चौकशीत निष्पन्न झालंय. दरम्यान, पोलिसांनी रात्री ताब्यात घेतलेल्या 100 जणांपैकी 90 जणांची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली आहे. यात 52 तरूण आणि 38 तरूणींचा समावेश आहे. या पार्टीत राहुल शर्मा आणि वेन पार्नेल हे आयपीएलचे खेळाडूही असल्याचं उघड झालाय. याच पार्टीत बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईरालाही आढळल्याचं पुढं आलं होतं. पोलिसांनी धाड टाकली त्यावेळी मनिषादेखील पार्टीत उपस्थित होती त्यामुळे पोलिसांनी तिला देखील चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं.

 

या सर्वांची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली असून, त्यांना वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडून देण्यात आलंय. या रेव्ह पार्टीत बॉलिवूड आणि आयपीएलचा  संगम पुन्हा एकदा पाहायला मिळालाय.

First Published: Monday, May 21, 2012 - 14:08
comments powered by Disqus