काँग्रेस- राष्ट्रवादीत बंडाळी

सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षालाही बंडाचा फटका बसला आहे. तिकीट न मिळालेल्या एका इच्छुक महिला कार्यकर्तीने थेट प्रदेशाध्यक्षांना जाब विचरण्याचा प्रयत्न केला. पक्षासाठी काम करणाऱ्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Updated: Feb 1, 2012, 10:33 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षालाही बंडाचा फटका बसला आहे. तिकीट न मिळालेल्या एका इच्छुक महिला कार्यकर्तीने थेट प्रदेशाध्यक्षांना जाब विचरण्याचा प्रयत्न केला. पक्षासाठी काम करणाऱ्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. खरंतर बंडखोरीचं ग्रहण लागू नये यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनीही आटोकाट प्रयत्न केले. पण काँग्रेसमधली बंडाळी पाहता नेत्यांच्या त्या प्रयत्नांना फारसं यश आलं नसल्याचं उघड झालं आहे. गुपचुपपणे उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगण्यात आलं होतं. पण त्यामुळं बंडोखोरी टाळता आली नाही. तिकीट न मिळाल्यामुळे विद्यमान नगरसेविका  मीना देसाई यांनी बंडखोरी केली.

 

काँग्रेस प्रमाणेच आघाडीतील एक घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसलाही बंडाळीची लागण झालीच. राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार उषा विजय पांडे यांच्याविरोधात महिला तालुका उपाध्यक्ष सुवर्णा जगदीश काळे यांनी अर्ज दाखल करून राष्ट्रवादीला  उघड आव्हान दिलं आहे. अकोल्यातही तिकीट न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाराज कार्यकर्त्यांनी जिल्ह्याध्यक्षांच्या कार्यालयात  गोंधळ घातला.

 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीतील दोन्ही पक्षाला बंडाळीचा फटका बसला आहे. हे बंड शमणार की बंडोबा  निवडणुकीच्या रिंगणात कायम राहणार हे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतरच स्पष्ट होईल.