ट्रेनी मारून नेताहेत वेळ, प्रवाशांच्या जीवाशी खेळ

मुंबईत पश्चिम रेल्वेच्या २०० मोटरमनने अचानक संप पुकारल्यानंतर प्रशासनाने शिकाऊ मोटरमनच्या हातात लोकल देऊन मुंबईकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू केला आहे. दर अर्धा तासाने एक लोकल सोडण्यात येत असून याचा संपूर्ण ताबा शिकाऊ म्हणजे ट्रेनी मोटरमनच्या हातात आहे.

Updated: Jul 20, 2012, 06:27 PM IST

www.24taas.com, मुंबई

मुंबईत पश्चिम रेल्वेच्या २०० मोटरमनने अचानक संप पुकारल्यानंतर प्रशासनाने शिकाऊ मोटरमनच्या हातात लोकल देऊन मुंबईकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू केला आहे. दर अर्धा तासाने एक लोकल सोडण्यात येत असून याचा संपूर्ण ताबा शिकाऊ म्हणजे ट्रेनी मोटरमनच्या हातात आहे.

 

 

अचानक २०० मोटरमन हे रजेवर गेल्याने प्रशासनाने तातडीचा उपाय म्हणून शिकाऊ मोटरमनला लोकल चालविण्यास दिले आहे.

 

मोटरमनच्या संपामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. रेल्वे प्रशासनाच्या मनमानीविरोधात मोटरमन हे रजेवर गेले आहेत.

 

२०० हून अधिक मोटरमन आता रजेवर जाण्याच्या तयारीत असल्याचे समजते आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे चांगलेच हाल होण्याची शक्यता आहे. ऐन संध्याकाळच्या वेळेस वाहतूकीचा खेळखंडोबा झाल्याने पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मनस्ताप होणार आहे.

 

गेल्यावर्षीच पश्चिम रेल्वेचे ६० मोटारमन अचानक संपावर गेले होते.  सहकाऱ्याला बडतर्फ केल्याच्या निषेधार्थ मुंबईतील पश्चिम रेल्वेने हा संप केला होता. एकूण ४५० पैकी ६० मोटरमनने अचानक संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. सुरूवातीला त्यांनी आजारी असल्याचं कारण देऊन कामावर गैरहजर राहण्याचे सांगितले होते. त्यानंतर सर्व ६० मोटरमनने संपावर गेले होते. आताही अशाच प्रकारे मोटरमन रजेवर गेल्याने वाहतुकीचा चांगलाच खेळखंडोबा झाला आहे.

 

बस आली धावून

अचानक २०० मोटरमन रजेवर गेल्यामुळे सगळ्यांचीच भंबेरी उडालीय. जेव्हा जेव्हा रेल्वेचा खोळंबा होतो तेव्हा तेव्हा ‘बेस्ट’ प्रवाशांच्या मदतीला धावून येते. पण, आज काहीही पूर्व कल्पना न देता सामूहिक रजेवर गेलेल्या मोटरमन्समुळे बेस्ट प्रशासनाचीही धांदल उडालीय. तरीही जिथं जिथं गरज असेल तिथं तिथं ज्यादा बसेस सोडण्यात येतील असं बेस्ट प्रशासनानं जाहीर केलंय. तसंच एसटी महामंडळानंही या परिस्थितीत प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरु केलाय.

 

आत्तापर्यंत बेस्टकडूननं १५ ज्यादा बसेस सोडल्या गेल्यात. माहिम, अंधेरी, सांताक्रूझ या भागांत या बसेस सोडण्यात आल्यात. एसटी महामंडळाकडूनही ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहेत. यासाठी काही खाजगी गाड्यांची मदत घेण्याचाही विचार बेस्ट आणि एसटी महामंडळामध्ये सुरू आहे. रेल्वे स्टेशनवर गर्दी ओसंडून वाहत असल्यामुळे प्रवाशांनी रस्त्यारस्यांवरही गर्दी केलीय. त्यामुळे या ज्यादा बसेसही कमी पडण्याची शक्यता आहे.

 

शुक्रवारचा दिवस असल्यामुळे चाकरमानी, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या गर्दीत आढळून येत आहेत. महिला, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिकांचाही या घटनेमुळे खोळंबा झालाय. रेल्वे मोटरमन्सनं पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना वेठीला धरल्यामुळे नागरिकांनी मात्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. बऱ्याच वेळ स्टेशनवर उभं राहूनही गाडीचा काही पत्ता नाही, रेल्वे अधिकाऱ्यांना काही विचारलं तर योग्य माहिती मिळत नसल्याची तक्रार प्रवाशांनी केलीय. कामावरून घरी परतणाऱ्यांची एकच तारांबळ उडालीय. ही परिस्थिती कधीपर्यंत कंट्रोलमध्ये येईल, याबद्दल मात्र अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे.