पुणे स्फोटानंतर मुंबईसह राज्यात हायअलर्ट

Last Updated: Wednesday, August 1, 2012 - 21:48

www.24taas.com, मुंबई

 

पुण्यात चार स्फोट झाल्यानंतर मुंबईसह राज्यात हायअलर्ट जारी करण्यात आले आहे. सर्वत्र कडेकोट बंदोबस्तात वाढ कऱण्यात आली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्येही अलर्ट जारी केला गेला आहे.

 

पुण्यातील शहरातील गजबजलेल्या जंगली महाराज रस्त्यावर लहान आवाजाचे चार स्फोट झाले. हे स्फोट एखाद्या मोठ्या दहशतवादी संघटनेने केलेले नसून, केवळ घबराट निर्माण करण्याच्या उद्देशाने एखाद्या गटाने केली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. दरम्यान, विरोधीपक्ष नेते एकनाथ खडसे यांनी सरकारला दोषी धरले आहे. हे स्फोट होण्यामागे योगायोग आहे का? की सरकारचे कारस्थान आहे, असा आरोप केला. पुणे हे टार्गेट करण्यात येत आहे. याची चौकशी झाली पाहिजे. ही कोणाला सलामी नाही ना, असे खडसे म्हणाले.

 

बालगंधर्वजवळील परिसरात एक, डेक्कन बसथांब्यापासून जवळ असलेल्या 'मॅकडोनाल्ड'च्या कचरापेटीत एक, देना बँकेच्या जवळ एक आणि कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालयाजवळ एक स्फोट झाला आहे. तसेच, या स्फोटांमध्ये एकजण किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

 
या स्फोटांनंतर या परिसरातील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. पुण्यासह मुंबईच्या दहशतवादविरोधी पथकाचे अधिकारी, बॉम्बशोध पथक, तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. हे स्फोट कशामुळे झाले किंवा कोणी घडवून आणले, याबाबतची अधिक माहिती कळू शकलेली नाही.

First Published: Wednesday, August 1, 2012 - 21:48
comments powered by Disqus