मुंबई मनपाच्या जिमखाना विभागात भ्रष्टाचार

Last Updated: Wednesday, July 18, 2012 - 22:22

हेमंत बिर्जे, www.24taas.com, मुंबई

 

मुंबई महापालिकेच्या जिमखाना विभागात भ्रष्टाचार झालाय. जिमखान्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या वस्तू, जिमखाना जागेत उभी असणारी जाहीरात होर्डींग्ज यामध्ये तर गैरव्यवहार झाल्याचं समोर आलंच आहे. शिवाय पालिकेतल्या खेळाडूंचे भत्तेही जिमखाना कार्यकारणीनं हडप केल्याचा आरोप खेळाडूंनी केला आहे. याप्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीनंतर जिमखान्याची कार्यकारणी बरखास्त करण्यात आली.

 

मुंबई महापालिकेची शिवाजी पार्क आणि आझाद मैदान या दोन जिमखान्यांची अवस्था पाहिल्यास यावर खर्च केला जाणारा पैसा जातो कुठे असा प्रश्न नक्कीच निर्माण होतो. जिमखान्यातील ट्रेडमिल, पूलबार, सायकलिंग यासारखे व्यायामाचे साहित्य गंजलेल्या अवस्थेत आहेत. जिमखाना कार्यकारणीनं या वस्तू नव्यानं खरेदी केल्याचं बिल जमाखर्चात दाखवलंय. परंतू या वस्तू जिमखान्यातच नसल्याचं झी 24 तासच्या कॅमे-यात उघड झालंय. शिवाजी पार्कवरच्या लॉन टेनिस मैदानाची दुरावस्थाही अशीच आहे. जिमखाना जागेत उभी असणा-या जाहिरात होर्डींग्ज आणि भाड्यानं देण्यात येणारे हॉल.

 

याच्या कोणत्याही आर्थिक व्यवहाराच्या नोंदी वार्षिक अहवालात घेतला नसल्याचं पालिकेच्या चौकशीत उघड झालंय.  भ्रष्टाचारासंदर्भात जिमखान्याचे कार्याध्यक्ष केवलानंद बर्वे आणि सचिव श्रीकांत कामतेकराना विचारले असता त्यांनी उत्तर देण्यास नकार दिलाय. तसंच भत्ते हडप केल्याचा आरोपही खेळाडूंनी कार्यकारणीवर केलाय.

 

महापालिकेनं स्थापन केलेल्या चौकशी समितीनं जिमखान्यातील भ्रष्टाचार उघड केलाय. त्यामुळं प्रशासनानं जिमखान्याची कार्यकारणी समिती बरखास्त करत 6 महिन्यांसाठी प्रशासक नेमलाय. जिमखाना विभागात 1986 मध्येही सचिव श्रीकांत कामतेकरानी खोटी बिले देऊन गैरव्यवहार केला होता. तरीही कामतेकरानांच नेहमी कार्यकारणीवर ठेवण्यामागचे कारण काय आणि त्यांना पाठिशी घालणारे राजकारणी, प्रशासकीय अधिका-यांची नावेही समोर येण्याची गरज आहे.

 First Published: Wednesday, July 18, 2012 - 22:22


comments powered by Disqus