मृणाल गोरे यांच्याच शब्दात...

Last Updated: Wednesday, July 18, 2012 - 12:11

लोकचळवळींचे माहेरघर गोरेगाव  - मृणाल गोरे

 

www.24taas.com, मुंबई

 

लग्न होऊन गोरेगावात आले तेव्हा इथे तर बाबुराव सामंतांच्या नेतृत्वाखाली समाजवादी विचारधारेचं बीज आधीच रुजलं होतं. सामंत आणि बंडू गोरे एकमेकांचे चांगलेच मित्र. त्यामुळे त्यांच्याबरोबर लगेचच इथल्या राजकारणात माझा प्रवेश झाला. तेव्हा गोरेगावचीलोकवस्ती जेमतेम वीस- पंचवीस हजाराची होती आणि त्याचा समावेश अजून मुंबई महानगरात व्हायचाच होता. अवतीभोवती झपाट्याने वाढत चाललेल्या शहराच्या गर्दीत गोरेगावसारख्या उपनगराने आपलं गावपण अजून जपून ठेवलंय याचं कौतुक करायला हवं. पण मला वाटतं गोरेगावच्या विस्ताराच्या जोडीने इथल्या विकासासाठी वेळोवेळी जे लढे झाले, ज्या सामाजिक, सांस्कृतिक चळवळी उभ्या राहिल्या त्यांचा वाटा गोरेगावने जपलेल्या या वैशिष्ट्यांमध्ये मोठा आहे.

 

गोरेगावच्या बदलाची मी साक्षीदार आहे, एवढंच नाही तर त्यात प्रत्यक्ष सहभागीही राहिले आहे. लग्नापूर्वी खारमध्ये राहत असतानाच तिथल्या सेवा दलाच्या शाखांमध्ये मी जाऊ लागले होते. लग्न होऊन गोरेगावात आले तेव्हा इथे तर बाबुराव सामंतांच्या नेतृत्वाखाली समाजवादी विचारधारेचं बीज आधीच रुजलं होतं. सामंत आणि बंडू गोरे एकमेकांचे चांगलेच मित्र. त्यामुळे त्यांच्याबरोबर लगेचच इथल्या राजकारणात माझा प्रवेश झाला. तेव्हा गोरेगावची लोकवस्ती जेमतेम वीस- पंचवीस हजाराची होती आणि त्याचा समावेश अजून मुंबई महानगरात व्हायचाच होता. पण हे उपनगर शहराला अगदी लागून, जवळजवळ वेशीपाशीच असल्याने शहरीकरणाचं लोण झपाट्याने येत होतं. तरीही त्या वाढत्या शहराचा सगळा कारभार अजूनही ग्रामपंचायतीच्या हातात होता. शाळा जिल्हा परिषदेची होती, दवाखानाही जिल्हा परिषदेचाच. सरपंच पुन्हा बाबुराव सामंतच होते. त्यांचं घर त्या भागातलं वजनदार प्रस्थ असल्याने त्यांचा गावावर वचक होता.

 

जुन्या गावांमध्ये पाटलाच्या घराचा असावा तसा. पण अशी महत्त्वाची व्यक्ती लोहियांच्या, जयप्रकाश नारायण वगैरेंच्या विचारांच्या प्रभावाखाली असल्याने या सरपंचपदाचा, ग्रामपंचायतीच्या अधिकारांचा अधिकाधिक वापर लोककल्याणासाठी कसा करता येईल याकडेच त्यांचा कटाक्ष असायचा. बाकी गाव म्हणावं तर प्रामुख्याने मध्यमवर्गीय वस्तीचं, पण आजच्यासारख्या उंच इमारती इथे नव्हत्या. त्याऐवजी खाजगी मालकीच्या छोटय़ा वाडय़ा होत्या. वाडय़ांमध्ये स्वतंत्र विहिरी असायच्या. पाण्याची सोय या विहिरींतूनच व्हायची. मुंबईचं पाणी शेजारी जोगेश्वरीपर्यंत पोहोचलं होतं पण इथे नाही. उरलेल्या ब-याच मोकळ्या जमिनी या खोतांच्या, त्यातही प्रामुख्याने मालाडच्या खोतांच्या होत्या आणि त्यावर बांधल्या गेलेल्या झोपडपट्टय़ांतून सगळा कष्टकरी समाज राहायचा. आजच्यासारख्या रस्त्यांच्या सोयीही नव्हत्या. पण या भागाच्या एकेका प्रश्नाला घेऊन जसजशी आंदोलनं होत गेली तसतसं लोकांपर्यंत एवढी माहिती नक्कीच पोहोचत गेली की हा मतदारसंघ काही तरी वेगळा आहे.

 

ग्रामपंचायतीवर निवडून आल्यावर माझ्या कामाला सुरुवात केली तेव्हा ते प्रामुख्याने महिलांशी संबंधित होतं. मला आठवतं, त्या महिला एक मूल हाताशी, एक मूल कडेवर अशा यायच्या. माझी एकच मुलगी बघून विचारायच्या, ‘असं का? आणखी मुलं झाली नाहीत?’ मी म्हणायचे, झाली नाहीत म्हणजे, आम्ही होऊ दिली नाहीत. त्यांना या गोष्टीचं नवल वाटायचं. कारण कुटुंब नियोजनाच्या साधनांबद्दल त्यांना काहीच माहिती नव्हती. तेव्हा मग मी माझी डॉक्टर बहीण कुमुद गुप्ते हिच्या मदतीने त्यासाठी शिबिरं घ्यायला सुरुवात केली. पार विरारपासून बायका या शिबिरांना यायच्या, कारण संपूर्ण उपनगर भागात अशा प्रकारची कोणतीही सोय उपलब्ध नव्हती. इथली शाळाही आमच्या घराजवळ होती. चौथीपर्यंतच होती. पण माझं तिथेही सतत येणं-जाणं असायचं त्यामुळे तिथल्या कामाला आपोआपच शिस्त राहत होती. या अशा सगळ्या कामांमुळे एक होत होतं की माझी ओळख गोरेगावातल्या घराघरांत होत होती. ती किती जवळिकीची बनली आहे त्याचा प्रत्यय गोरेगावला महानगरपालिकेचा भाग बनवण्यात यावं, ही मागणी आम्ही पूर्ण करून घेतली तेव्हा आला.

&n

First Published: Wednesday, July 18, 2012 - 12:11
comments powered by Disqus