राज ठाकरेंच्या मनसेत गद्दारीची कीड!

Last Updated: Wednesday, May 16, 2012 - 18:46

www.24taas.com, मुंबई

 

पक्षात आजही गटबाजी सुरू आहे. ही गटबाजी संपत नसल्याने पक्षाला फटका बसत असल्याचे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचे कान चांगलेच उपटले. निमित्त होते ते, पदाधिकारी, आमदार, नगरसेवक यांच्या बैठकीचे.

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मंगळवारी ही बैठक बोलावण्यात आली होती. या वेळी  राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचा फटकारले.  पक्षातील गटबाजीमुळे महापालिका निवडणुकीत माझा अंदाज चुकला. मला बाहेर शत्रू नसून पक्षातच शत्रू आहेत, या शब्दात   राज  यां पदाधिका-यांना चांगलेच खडे बोल सुनावले. पक्षाला मनपा निवडणुकीत यश मिळाले असले तरी ते अपेक्षेप्रमाणे नसल्याने ते नाराज होते, ही बाब आता बैठकीबाहेर आली आहे.

 

महापालिका निवडणुकीत पक्षाला ७० ते ८० जागा जिंकण्याची अपेक्षा होती, परंतु माझी ही अपेक्षा अंतर्गत  गटबाजीमुळे पूर्ण झाली नाही. चांगले काम करण्यासाठी प्रत्येक वेळेला तुम्हाला पक्षादेशाची गरज कशाला लागते?  असे सांगून पदाधिकाऱ्यांना खडसावले. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी माना खाली घालून राज यांचा संताप पाहिला. राजकारण करताना समाजसेवा महत्वाची असते. त्यामुळे दुष्काळाचं राज्यावर संकट असताना गावाला जाण्याऐवजी दुष्काळग्रस्त भागाला भेटी द्या. समाजसेवा करताना घराकडे पाठ आणि समाजाकडे तोंड असायला हवे. प्रत्येक वेळेला मला मेळावा घेऊन इंजेक्शन देण्याची गरज कशाला लागते, असा खडा सवाल उपस्थित केला.

 

पक्ष वाढविण्यासाठी तुमच्या परीने तुम्ही कामाला लागा, अशा कानपिचक्यांनी राज यांनी दिल्या. निवडणुकांनंतर मी अहवाल मागवले होते. त्यात गद्दारांची नावे आहेत. त्यांची साफसफाई करूनच पुढे पाऊल टाकणार आहे, अशा शब्दांमध्ये राज यांनी गद्दारांना इशारा दिला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर गटबाजी दिसून आली त्यावेळी राज यांनी डोळे झाक केली होती. मात्र, लाता लक्ष केंद्रीत करून एका एकाचा समाचार घेण्याचा इरादा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत स्पष्ट केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

First Published: Wednesday, May 16, 2012 - 18:46
comments powered by Disqus