राष्ट्रपती अफजल गुरुला फाशी द्या - ठाकरे

Last Updated: Monday, July 23, 2012 - 12:02

www.24taas.com, मुंबई

 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीसुद्धा नवनिर्वाचित राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं अभिनंदन केलंय.अभिनंदन करताना दहशतवादी अफजल गुरुचा अर्ज फेटाळून त्याला फासावर लटकावा आणि इतिहास घडवा, अशी मागणी बाळासाहेबांनी मुखर्जी यांच्याकडे केली.

 

मुखर्जी यांच्याकडून राष्ट्रपती म्हणून खूप अपेक्षा आहेत नव्हे आमचा हट्टच आहे, असंही बाळासाहेबांनी म्हटलंय.  त्यामुळं सर्वप्रथम अफजल गुरुचा अर्ज फेटाळून त्याला फासावर लटकवा असं बाळासाहेबांनी म्हटलंय.देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला करणारे अतिरेकी जिवंत राहता कामा नयेत. असंही बाळासाहेबांनी शिवसेनेच्या सामना मुखपत्रात नमूद केले आहे.

 

‘इतिहासाची पुनरावृत्ती होते काय ते सांगता येत नाही, पण या देशाला ‘आझादी’ मिळवून देणारा एक त्रिशूळच होता. तो म्हणजे लाल बाल पाल. लाल म्हणजे लाला लजपतराय, बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल. आजही या नावांची जादू कायम आहे. ‘लाल’ यांचा पंजाब पंतप्रधानपदी बसलेलाच आहे, पण देशाला हवी असलेली मजबुती आलेली नाही. कारण सोनियाकृपेने सगळाच नेभळट कारभार सुरू आहे. टिळकांची जागा कुणीच घेऊ शकणार नाही. बिपिनचंद्र पाल यांची जागा आता प. बंगालचे प्रणव मुखर्जी भूषवीत आहेत ही अभिमानाची बाब आहे.

 

प्रणव मुखर्जी यांच्याकडून राष्ट्रपती म्हणून आमच्या खूपच अपेक्षा आहेत नव्हे आमचा हट्टच आहे. सर्वप्रथम त्या अफझल गुरूच्या दयेचा अर्ज फेटाळून लावा व त्याला फासावर लटकवा. देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला करणारे असे अतिरेकी जिवंत राहता कामा नयेत. इथूनच आपल्या कारकीर्दीची सुरुवात करा आणि नवा इतिहास घडवा. हे पवित्र कार्य करावेच लागेल. माझ्यातर्फे, कार्यप्रमुख उद्धव व असंख्य शिवसैनिकांतर्फे आपले शतश: अभिनंदन!, असे सामनामध्ये म्हटले आहे.

 

First Published: Monday, July 23, 2012 - 12:02
comments powered by Disqus