शेवटची दुर्दैवी हाक, अजितदादा वाचवा आम्हांला......

Last Updated: Friday, June 22, 2012 - 18:04

www.24taas.com, मुंबई

 

मुलाच्या इंजिनिअरिंगच्या अॅडमिशनसाठी बारामतीमधले महेश गुगळे त्यांचा मित्र उमेश पोतेकरांबरोबर अजित पवारांना भेटायला गेले. आणि तिथेच काळानं त्यांना गाठलं. 'अजितदादांना आम्हांला वाचवा' असा टाहो त्यांनी फोडला... पण दुर्दैव अजितदादाही त्यांना वाचवू शकले नाही.  अजितदादांना आम्हांला वाचवायला सांगा, हे त्यांचे शेवटचे शब्द. आणि त्यानंतर त्यांच्याशी संपर्क तुटला तो कायमचाच.

 

उमेश पोतेकर आणि महेश गुगळे दोघेही घनिष्ठ मित्र.. शाळेत एकाच वर्गात शिकलेले. उमेश पोतेकर बारामती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तर महेश गुगळे बारामती मर्चंट असोसिएशनचे उपाध्यक्ष. अजितदादांशी दोन्ही कुटुंबांचा घरोबा. महेश गुगळेंच्या मुलाच्या इंजिनिअरिंगच्या अॅडमिशनसाठी अजित पवारांना भेटायचं होतं. त्यासाठीच दोघेही गुरुवारी मंत्रालयात गेले होते. तिथेच त्यांना काळानं गाठलं. धुराच्या लोटांचा सामना करत असतानाच उमेश यांनी बारामतीत त्यांचे भाऊ मनोज यांना फोन केला.

 

आम्ही आगीत आणि धुरात अडकलोय, अजितदादांना सांगा आम्हांला सोडवायला, असं त्यांनी भावाला सांगितलं. त्यानंतर मोबाईल नॉट रिचेबल झाला तो कायमचाच... आणि बारामतीकरांना बातमी समजली ती उमेश आणि महेश यांच्या मृत्यूचीच... उमेश यांच्या भावानं अजित पवारांना तात्काळ फोन करुन भावाला वाचवण्याची विनंती केली. पण अजितदादांची कुठलीच यंत्रणा दोघांनाही वाचवू शकली नाही.

 

अवघं बारामती या बातमीनं सुन्न झालं. बारामतीतल्या या दोन्ही युवा कार्याकर्त्यांच्या मृत्यूनं सगळ्यांनाच धक्का बसला. दोघांचेही मृतदेह बारामतीत पोहोचताच, बारामतीकरांनी एकच हंबरडा फोडला. कुटुंबीयांचा आक्रोश, सुन्न चेहरे आणि भरलेल्या डोळ्यांनी बारामतीकरांनी दोघांनाही अखेरचा निरोप दिला. संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. मंत्रालयाच्या आगीत चार मजले जळून खाक झाले. हे नुकसान भरुन निघेलही... पण ज्यांनी जवळची माणसं गमावली, त्यांचं सांत्वन कुठल्या शब्दांत करायचं....

 

 

 First Published: Friday, June 22, 2012 - 18:04


comments powered by Disqus