सीमावासियांच्या पाठिशी शिवसेना - ठाकरे

Last Updated: Sunday, July 8, 2012 - 18:05

www.24taas.com, मुंबई

 

कर्नाटक सरकारच्या बेळगाव महापालिकेच्या बरखास्तीच्या निर्णयाविरोधात पाठिंबा मिळवण्यासाठी बेळगावचे मराठी नेते सध्या महाराष्ट्र दौ-यावर आहेत. आज बेळगावच्या महापौर आणि नगरसेवकांनी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांची भेट घेतली. सुमारे तासभर त्यांनी बाळासाहेबांशी चर्चा केली. यावेळी शिवसेना शेवटपर्यंत सीमावासियांच्या पाठिशी राहिली असं आश्वासन बाळासाहेबांनी सामीवासियांना दिलं.

 

१५ डिसेंबर २०११ ला बेळगाव पालिका कर्नाटक सरकारनं बेकायदेशीरपणे बरखास्त केली होती. त्यानंतर कन्नड विरूद्ध मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. या धर्तीवर बेळागावच्या मराठी नेत्यांनी आपला लढा अधिक भक्कम करण्यासाठी तयारी सुरू केलीय. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी शिवसेनाप्रमुखांची भेट घेतली. कर्नाटक सरकारविरोधातल्या लढ्यात ठाण्याच्या महापौरांनीही सहभागी व्हावे यासाठी बेळगावच्या महापौर मंदा बाळकुंद्रे आणि त्यांच्या सहका-यांनी ठाण्याचे महापौर हरिश्चंद्र पाटील यांची भेट घेतली.

 

तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरच मुंबई ठाण्यातल्या भाजप नेत्यांनाही भेटणार असल्याचं बेळगावच्य़ा महापौर मंदा बाळकुंद्रे यांनी सांगितलंय. त्यामुळे महाराष्ट्रातले भाजप नेते बेळगावच्या मराठी माणसाच्या मागे उभे राहतात की स्वपक्षीय सरकारच पाठराखण करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. गतवर्षी १नोव्हेबर या कर्नाटक दिनी बेळगावच्या मराठी नेत्यांनी निषेध दिन पाळला होता त्याविरोधात कर्नाटक सरकारनं बेळगाव महापालिकाच बरखास्त केली होती.First Published: Sunday, July 8, 2012 - 18:05


comments powered by Disqus