१ मे पासून हॉटेलिंगही महागणार

Last Updated: Monday, April 16, 2012 - 23:08

www.24taas.com, मुंबई

 

सगळंच महाग झालं असताना आता हॉटेलिंगही महागणार आहे. कारण रेस्टॉरंटमधल्या पदार्थांचे दर 1 मेपासून 10 ते 15 टक्क्यांनी वाढणार आहेत.मुंबईतल्या रेस्टॉरंटमध्ये तुमच्या हाती नवं मेनूकार्ड दिसलं तर चक्राऊन जाऊ नका. कारण दरवर्षी जूनमध्ये मेनूकार्डमध्ये नव्यानं करण्यात येणारी दरांची निश्चिती यंदा महिनाभर आधीच होणार आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये 1 मेपासूनच नवं रेट कार्ड तुमच्यासमोर येईल. रेस्टॉरंटचा ब्रँड, त्याचे ठिकाण आदी गोष्टी ध्यानात घेऊन हे दर ठरवण्यात येतात. हॉटेलमालकांची संघटना आहारकडून मिळालेल्या माहितीनुसार 10 ते 15 टक्के वाढ गृहित धरली तर रेस्टॉरंटमध्ये 1 मे पासून  साधारणतः असे दर पाहायला मिळतील.

 

व्हेज बिर्याणी आणि पनीर टिक्कासाठी 90 रुपयांऐवजी 110 रुपये मोजावे लागतील. चिकन टिक्कासाठी आधी 110 रुपये द्यावे लागत होते. नव्या दरानुसार त्यासाठी आता 140 रुपये मोजावे लागतील. 75 रुपयांना मिळणा-या दाल-तडकासाठी तुमच्या खिशाला 90 रुपयांची फोडणी पडेल.रेस्टॉरंट मालकांच्या मते गेल्या वर्षभरात सगळ्याच गोष्टी महागल्यात. मात्र सगळ्यात जास्त परिणाम स्वयंपाकाचा गॅस महागल्यानं झालाय.

 

व्यावसायिक वापरासाठी असणा-या एलपीजीची किंमत जानेवारीत 1350 रुपये होती. मात्र ती आता 1800 रुपयांवर पोहचलीय. क्रीम दुधाचे दर 36 रुपयांवरून 42 रुपये झालेत. एक किलो पनीरसाठी 130 रुपयांऐवजी 160 रुपये मोजावे लागतायत. साखरेच्या दरातही 30 वरुन 34 रुपये अशी वाढ झालीय. तेलाच्या किंमतीही 85 रुपये किलोवर पोहचल्यात.

 

याशिवाय भाज्याही 10 ते 40 टक्क्यांनी महागल्यात.. वाढलेल्या सर्विस टॅक्सचा परिणामही नव्या दरावर दिसून येतोय.सगळेच रेस्टॉरंट मालक दर वाढवण्याच्या विचारात
आहेत. पण दरवाढीनंतर ग्राहक दुरावतील अशी चिंताही त्यांना सतावतेय. कारण किंमतींच्या बाबतीत बड्या रेस्टॉरंट्ना आता स्ट्रीट फूड विक्रेत्यांशीही स्पर्धा करायला लागतेय.

 First Published: Monday, April 16, 2012 - 23:08


comments powered by Disqus