‘मातोश्रीवर येऊन जिगर घेऊन जा...’

Last Updated: Tuesday, August 7, 2012 - 11:28

www.24taas.com, मुंबई

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या ब्लॉगवर जोरदार टीका केलीय. देश अराजकाच्या उंबरठ्यावर उभा असताना, अस्थिरतेतून दिशा दाखवण्याचे कार्य राष्ट्रीय लोकशाही आघाडीला करायचंय, असा उपदेशही यावेळी त्यांनी अडवाणींना केलाय.

 

भारतीय जनता पक्षास नक्की काय झाले आहे? त्यास एखादा आजार जडला आहे की तो अंतर्कलहाने बेजार झाला आहे? असा प्रश्न विचारत बरेच नेते ब्लॉगवरून राजकारण खेळत असल्याचा टोला यावेळी बाळासाहेबांनी लगावलाय. मात्र, आमचे राजकारण हे मैदानी आणि मर्दानी असल्याचंही त्यांनी खास ठाकरी भाषेत सुनावलं. देशात काँग्रेसच्या विरोधी वातावरण तापलं आहे. राजस्थान, आसाममध्ये काँग्रेसची स्थिती दयनीय झाली आहे. जयललिता, नवीन पटनाईक, ममता बॅनर्जी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसही राष्ट्रील लोकशाही आघाडीबरोबर यायला मागेपुढे पाहणार नाहीत, असा राजकीय कयासही शिवसेनाप्रमुखांनी व्यक्त केलाय. ‘याबरोबर आम्ही स्वत: फ्रीस्टाइल कुस्तीवाले आहोत. कॉंग्रेसला चारीमुंड्या चीत करण्यासाठी आम्ही कुठेही वार करू. कसेही लोळवू. कसेही तंगडे टाकून त्यांची टांग मारू’ असं म्हणत बाळासाहेबांनी 2014  साठी आपण सज्ज असल्याचं म्हटलंय. ‘मित्रा, हिंमत हरू नकोस! असं म्हणत अडवाणींना धीर देतानाच ‘‘मातोश्री’वर येऊन आमच्याकडून हिंमत व जिगर कामापुरती घेऊन जा’ असा उपरोधिक टोलाही बाळासाहेबांनी लालकृष्ण अडवाणींना लगावलाय.

 

दोन दिवसांपूर्वी अडवाणींनी आपल्या ब्लॉगमध्ये ‘लोकसभा निवडणूक २०१४ मध्ये काँग्रेस आणि भाजपला बहुमत मिळणं अशक्य’ असल्याचं भाकित वर्तवलं होतं. ‘२०१४च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला १०० हून अधिक जागा मिळणे अवघड आहे तर भाजपही बहुमताच्या जादूई आकड्याला स्पर्श करु शकणार नाही.  त्यामुळे काँग्रेस आणि भाजप त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला पंतप्रधान करण्यापेक्षा सहकारी पक्षाच्या नेत्याला पंतप्रधान करण्याची शक्यता अधिक आहे. तिसरी आघाडीही सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत असणार नाही’ असं अडवाणींनी मत अडवाणींनी ब्लॉगद्वारे मांडलं होतं.

 

.First Published: Tuesday, August 7, 2012 - 11:28


comments powered by Disqus