‘शिव वडापाव’ही झाका - नीतेश राणे

उत्तर प्रदेशात ज्या पद्धतीने मायावतींचे निवडणूक चिन्ह असलेल्या हत्तींना झाकण्याची कारवाई करण्यात आली, त्याच धर्तीवर शिवसेनेच्य ‘शिववडा या वडापावच्या गाड्यांवरील नावांवरही स्टिकर्स लावण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Updated: Jan 10, 2012, 04:42 PM IST

www.24taas.com, मुंबई

उत्तर प्रदेशात ज्या पद्धतीने मायावतींचे निवडणूक चिन्ह असलेल्या हत्तींना झाकण्याची कारवाई करण्यात आली, त्याच धर्तीवर शिवसेनेच्या ‘शिववडा या वडापावच्या गाड्यांवरील नावांवरही स्टिकर्स लावण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. नीतेश राणे यांच्या या भूमिकेमुळे निवडणुकीच्या तोंडावर स्वाभिमान आणि सेनेमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.

 

 

नीतेश राणे यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून ही मागणी केली आहे. शिवसेनेने मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शिव वडापावच्या गाड्या मुंबईच्या विविध ठिकाणी सुरू केल्या आहेत. सध्या मुंबई महापालिकेची निवडणूक असल्याने आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे या गाड्यांवरील नावांमुळे मतदारांवर प्रभाव पडू शकतो, त्यामुळे अशा गाड्यांच्या नावांवर स्टिकर्स लावण्यात यावे, अशी मागणी नीतेश राणे यांनी केली आहे.

 

 

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने मागणी केल्यानंतर मायावती यांचे निवडणूक चिन्ह असलेले हत्ती झाकण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे. त्यानुसार आज उत्तरप्रदेशात कारवाई करण्यात आली. याच मुद्दाचे राजकारण करत नीतेश राणे यांनी ही मागणी केली आहे. त्याच्या या मागणीवर आता निवडणूक आयोग काय कारवाई करते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

उत्तर प्रदेशात मायावती आणि हत्तीचे पुतळे झाकण्याचा कार्यक्रम सध्या सुरु आहे. उत्तर प्रदेशात मायावती आणि हत्तींचे पुतळे झाकण्याची जोरदार कारवाई सुरू झाली आहे. यामध्ये हत्तीचे छोटे पुतळे १९०,मध्यम आकाराचे १६९ आणि मोठ्या मुर्ती २२ आहेत तर मायावतींचे ६ छोटे पुतळे आणि ९ मोठे पुतळे झाकावे लागणार आहेत.