एसआरएची १७ हजार घरे वापराविना!

मुंबईत एकीकडं घरांची मारामार असताना माहुल भागात एसआरएची सुमारे 17 हजार घरे वापराविना पडून आहेत. यातील बावीसशे घरे पोलिसांनाही दिली जाणारेत. परंतु एसआरए आणि बीएमसीच्या वादात ही घरे पडून आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 27, 2013, 11:18 PM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबईत एकीकडं घरांची मारामार असताना माहुल भागात एसआरएची सुमारे 17 हजार घरे वापराविना पडून आहेत. यातील बावीसशे घरे पोलिसांनाही दिली जाणार आहेत. परंतु एसआरए आणि बीएमसीच्या वादात ही घरे पडून आहेत.
लाखो मुंबईकरांना असं रस्त्याकडेला आणि नाल्याशेजारच्या झोपड्यांमध्ये कसबसं राहावं लागतंय. मात्र यांच्यासाठी बांधण्यात आलेली एसआरएची सुमारे 17 हजार घरे गेल्या दीड वर्षांपासून धूळखात पडून आहेत. एसआरए आणि बीएमसीच्या वादात ही घरं अडकून पडली आहेत. मुंबईत ब्रिमस्टोवॅट प्रकल्पांतर्गत रस्ता, नाला रुंदीकरण, मिठी नदीवरील अतिक्रमण काढताना बाधित होणाऱ्या लोकांसाठी चेंबूरच्या माहूल भागात एसआरएनं 72 बिल्डींग्जमध्ये सुमारे 17 हजार घरं बांधली आहेत. परंतु मुंबई महापालिका ही घरं ताब्यात घेण्यासाठी चालढकल करत असल्याचा आरोप एसआरएनं केला आहे. तर दुसरीकडं मुंबई महापालिकेनं जोपर्यंत पूर्णरित्या घरं तयार होणार नाहीत. तोपर्यंत घरं ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे.

या घरांमध्ये कोणीही राहायला नसल्यामुळं अनेक घरांमधील वायरिंग, स्वीच, दाराचे कडी-कोयंडा, पाण्याचे नळ चोरीला गेले आहेत. तसंच खिडक्यांच्या काचाही दगड मारून फोडण्यात आले आहेत. सध्या याठिकाणी सुरक्षारक्षक ठेवल्यानं अशा गोष्टींना आळा बसला आहे.
झोपडपट्टीत राहणारा प्रत्येकजण आपल्या हक्काच्या घराचं स्वप्नं पाहतोय. परंतु दोन प्रशासकीय व्यवस्थांच्या वादात त्यांचं स्वप्न पूर्ण होण्यात अडचणी येत आहेत