पॅरोल वाढविण्यासाठी संजय दत्तचा पुन्हा अर्ज

१९९३ सालातील मुंबई बॉम्बस्फोटातील आर्म्स अॅक्टनुसार, सध्या शिक्षा भोगणारा सिने अभिनेता संजय दत्त यानं पुन्हा एकदा आपल्या पॅरोलच्या मुदतीत वाढ करण्यासाठी अर्ज केलाय

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 9, 2014, 05:21 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
१९९३ सालातील मुंबई बॉम्बस्फोटातील आर्म्स अॅक्टनुसार, सध्या शिक्षा भोगणारा सिने अभिनेता संजय दत्त यानं पुन्हा एकदा आपल्या पॅरोलच्या मुदतीत वाढ करण्यासाठी अर्ज केलाय. यावेळीही संजयनं त्याची पत्नी मान्यता हिच्या आजाराचं कारण पुढे केलंय.
एका वर्तमानपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, संजय दत्त यानं खार पोलीस स्टेशनमध्ये हा अर्ज दाखल केलाय. २१ डिसेंबर २०१३ पासून संजय दत्तला पॅरोलवर येरवडा जेलमधून सुट्टी मिळालीय आणि तेव्हापासून तो बाहेरच आहे. पॅरोलची मुदत संपल्यावर संजय पुन्हा जेलमध्ये परतेल अशी अपेक्षा होती. परंतु, संजयची पत्नी मान्यता हिच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झालीय. अशावेळी संजयला आपल्या पत्नीसोबत जास्तीत जास्त वेळ राहायचंय. त्यामुळचे त्यानं पुन्हा एकदा आपल्या पॅरोलची मुदत आणखी एक महिन्यासाठी वाढविण्यासाठी अर्ज केलाय. डॉक्टरांनी मान्यताला पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला दिलाय, असं संजयनं या अर्जात म्हटलंय.
यापूर्वी संजयनं पत्नी मान्यता ही गंभीर आजाराशी झुंजत असल्यानं तिच्याजवळ उपस्थित असल्याचं सांगत पॅरोलसाठी पोलीस प्रशासनाला विनंती केली होती. परंतु, पॅरोलच्या मंजुरीच्या अगोदरच्याच दिवशी मान्यता दत्त एका फिल्मी पार्टीत बिन्धास्तपणे वावरताना दिसली. यानंतर, संजय दत्त याच्या पॅरोलचा विरोध होत होता. परंतु, त्यानंतरही प्रशासनानं संजय दत्तची विनंती स्वीकारली आणि एका महिन्याचा पॅरोलवर रजा मंजूर केली.
त्यानंतर, मान्यताच्या आजारपणाचं कारण सांगून संजय दत्तनं पुन्हा एकदा २१ जानेवारी रोजी आपल्या पॅरोलला वाढविण्यासाठी अर्ज केला. पुन्हा एकदा प्रशासनानं हा अर्ज स्वीकारत त्याला २० फेब्रुवारीपर्यंत पॅरोलची रजा वाढवून दिली होती.
आता, पुन्हा एकदा संजयला पॅरोलवर रजा वाढवून मिळणार का? याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.