युपीएचं सरकार अनौरसच!- बाळासाहेब

युपीए-२ सरकार अनौरसआहे, हे विधान केल्याबद्दल लालकृष्ण अडवाणींवर काँग्रेसने टीकेची झोड उठवली. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी अडवणींच्या विधानावर आपल्या ठाकरी शैलीत पाठिंबाच दिला आहे. अडवाणींच्या तोंडून चुकीने का होईना सत्य बाहेर पडलं, असं बाळासाहेबांनी ‘सामना’मध्ये म्हटलं आहे.

Updated: Aug 11, 2012, 05:38 PM IST

युपीए-२ सरकार अनौरसआहे, हे विधान केल्याबद्दल लालकृष्ण अडवाणींवर काँग्रेसने टीकेची झोड उठवली. सोनिया गांधींनाही आपला राग आवरता आला नव्हता. अखेर अडवाणींना आपलं विधान मागे घेत आपण युपीए-१ बद्दल बोलत होतो, असं म्हणावं लागलं होतं. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी अडवणींच्या विधानावर आपल्या ठाकरी शैलीत पाठिंबाच दिला आहे. अडवाणींच्या तोंडून चुकीने का होईना सत्य बाहेर पडलं, असं बाळासाहेबांनी ‘सामना’मध्ये म्हटलं आहे.

सामनामध्ये लिहिलं आहे, `चर्चेच्या ओघात लालकृष्ण आडवाणी यांनी सांगितले की, ‘यूपीए सरकार अनौरस आहे!’ या ‘अनौरस’ शब्दावरून कॉंगे्रसच्या अंगाचा म्हणे तीळपापड झाला. सोनिया गांधी लालेलाल आहेतच, पण तो लालेलाल चेहरा संतापाने काळानिळा झाला. त्या त्यांचे डोळे जरा जास्तच मिचकावू लागल्या व त्यांनी संसदेतील कॉंगे्रजी गुलामांना आडवाणी यांच्या विरोधात गोंधळ घालण्यास सांगितले. अर्थात गोंधळ वाढल्याने आडवाणी यांनी ‘अनौरस’ शब्द गिळून टाकला व माफी मागून मोकळे झाले. ‘मला यूपीए-१’विषयी म्हणायचे होते. पण चुकून यूपीए-२ हा शब्द तोंडातून बाहेर पडला, असा खुलासा नंतर आडवाणी यांनी केला.
अर्थात ‘स्लीप ऑफ टंग’मुळे का होईना, पण आडवाणी यांच्या मुखातून जळजळीत सत्यच बाहेर पडले व त्या सत्याची धार सोनिया गांधी व त्यांच्या बगलबच्च्यांना घायाळ करून गेली. खरे तर ती धारदार तलवार आणखी काही काळ चालवली असती तर सोनियांचे सैन्य गरगरून धारातीर्थी पडले असते. आडवाणी यांनी आसामच्या हिंसाचारावर जोरदार भाषण ठोकले. कॉंगे्रस सरकारचे संसदेत जोरदार वाभाडे काढले. आडवाणी त्यांच्या भाषणात म्हणाले ते खरेच आहे.` असं म्हणत आपल्या ठाकरी शैलीने पुन्हा एकदा शिवसेनाप्रमुखांनी काँग्रेसला घायाळ केलं आहे. युपीए-१ आणि युपीए-२ अनौरसच आहेतच, पण `सोनिया गांधीसुद्धा भारताच्या खऱ्या नागरिक कुठे आहेत`, असं म्हणत सोनिया गांधीच्या राष्ट्रीयत्वाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे.