नांगरे पाटलांना प्रमोशन; हिमांशू रॉय यांची उचलबांगडी!

राज्यातील ३७ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 

Updated: Apr 13, 2015, 05:17 PM IST
नांगरे पाटलांना प्रमोशन; हिमांशू रॉय यांची उचलबांगडी! title=

मुंबई : राज्यातील ३७ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 

विशेष म्हणजे, राज्याची क्राइम कॅपिटल बनलेल्या नागपूरचे पोलीस आयुक्त के. के. पाठक यांची अखेर बदली करण्यात आलीय. त्यांना आता पुण्याचं पोलीस आयुक्त करण्यात आलंय. तर त्यांच्या जागी नागपूरचे नवे पोलीस आयुक्त म्हणून एस. पी. यादव यांची नेमणूक करण्यात आलीय. 

नागपूर जेलमधून पाच कैदी फरार झाल्यानंतर तुरूंग महासंचालकांची बदली झाली होती. त्याजागी आता विठ्ठल जाधव यांची नियुक्ती करण्यात आलीय. 

दरम्यान, हिमांशू रॉय यांचीही एटीएसमधून उचलबांगडी करण्यात आलीय. त्यांना आता पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण मंडळाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक करण्यात आलंय. तर एटीएसमध्ये त्यांच्या जागी विवेक फणसाळकर यांची नियुक्ती करण्यात आलीय.

पुण्याचे पोलीस आयुक्त सतीश चंद्र माथूर यांना प्रमोशन देऊन कायदा आणि तांत्रिक विभागाचं पोलीस महासंचालकपद देण्यात आलंय. तर विश्वास नांगरे पाटील यांना पोलीस महानिरीक्षकपदी बढती देण्यात आलीय.

भाजप-शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात आयपीएस अधिकाऱ्यांच्या पहिल्यांदाच बदल्या करण्यात आल्यात. ज्या ठिकाणी नगरपालिका, महापालिका किंवा विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. तेथे निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण झाल्यावर बदली झालेले अधिकारी कार्यभार स्वीकारतील. ज्या ठिकाणी कोणतीही निवडणूक नाही. तिथे नवनियुक्त अधिकाऱ्यांनी तातडीने पदभार स्वीकारण्याचे आदेशही गृह विभागाने दिले आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.